आज हातगाडे हलवण्याचा निर्णय, ’हजीर तो वजीर’ची चर्चा, पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष, नोंदणीकृत हॉकर्स नेमके कुठले?
प्रतिनिधी / सातारा
गांधी मैदानानजिक असलेल्या आळूच्या खड्डय़ात हातगाडे हलवण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असतानाच रविवारी हातगाडीधारकांची राजवाडा येथील पशुवैद्यकीय केंद्रालगत बैठक पार पडली. हातगाडे लावण्याबाबतची चर्चा काही हातगाडीधारकांमध्ये सुरु होती. त्यातही ’हाजीर तो वजीर’ असा प्रकार असल्याने सोमवारी वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होणार असून सातारा पालिका यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा शहरात गांधी मैदानावरील चौपाटीमध्ये 70 हातगाडेधारक व्यवसाय करत होते. लॉकडाऊनच्या काळात हे सर्व हातगाडे बंद होते. आता पालिका हीच चौपाटी आळूच्या खड्डय़ात स्थलांतर करत आहे. तेथे जागाही पाहिली आहे. हातगाडीवाल्यांना जागाही निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. असे असताना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हातगाडीधारक एकत्र जमले होते.
त्यांच्यामध्ये सोमवारी काय करायचे यावर चर्चा सुरु होती. तर काहींनी ’हाजीर तो वजीर’, असे म्हणत ज्यांनी त्यांनी आपआपले हातगाडे आपाआपल्या जागेवर लावायचे अशी सुचना मांडली गेली. त्यामुळे नेमके हातगाडे कुठे लावणार ? हे हॉकर्सधारक, यातील किती हॉकर्सधारकांची नोंदणी पालिकेकडे आहे, याबाबत चर्चा सुरु असून या बैठकीला हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱयांना बोलवण्यात आले नव्हते. मात्र, त्यामुळे सोमवारी सकाळी नेमके काय होणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जे हातगाडीधारक नोंदणीकृत आहेत व जे स्वतः व्यवसाय करतात त्यांना प्राधान्याने जागा देण्याची गरज आहे. उगाच हातगाडीधारक असल्याचे सांगून जागा अडवायची आणि पुन्हा ती हातगाडी भाडय़ाने द्यायचा, हा वर्षानुवर्षांचा प्रकार आता बंद झाला पाहिजे, अशी मागणी पुढे येवू लागली असून आता पालिकेला या पारदर्शक भूमिका घ्यावी लागणार आहे.