विजापूर / वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील विजापूर जिल्हय़ात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या संघर्षात 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा जवानांनी केला आहे. त्यापैकी 4 जणांचे मृतदेह सापडले असून त्यात 2 महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. जवानांनी मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
विजापूर जिल्हय़ातील मिर्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक झाली असून सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. बस्तरमध्ये नक्षलवादी आपला पीएलजीए सप्ताह पाळत असतानाच सुरक्षा दलही अलर्ट मोडवर आहे. पोमरा जंगलात मोठय़ा प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री जवानांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. दुसरीकडे, शनिवारी सकाळी जवानांनी नक्षलवाद्यांच्या तळावर छापा टाकत मोठी कारवाई केली. सुमारे 30 ते 40 मिनिटे चाललेल्या या चकमकीत जवानांनी सुरुवातीला तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर आणखी तिघांना टिपण्यात यश आल्याने एकंदर सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नक्षलवाद्यांच्या मृतदेहासोबतच घटनास्थळावरून 303, 315 रायफल आणि मोठय़ा प्रमाणात स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. दुपारनंतर गोळीबार थांबला असला तरी शोधमोहीम सुरू होती.