छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमक
वृत्तसंस्था / सुकमा
छत्तीसगड अन् तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकींमध्ये 5 नक्षलवादी मारले गेले आहेत. ही चकमक सुकमामधील घनदाट जंगलांमध्ये झाल्याचे समजते. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मुन्नी या इनाम घोषित महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. सुकमा, दंतेवाडा आणि बस्तर जिल्हय़ातील रिझर्व्ह गार्डच्या जवानांनी चकमकीत हे यश मिळविले आहे.
तेलंगणाचे विशेष नक्षलविरोधी पथक ग्रेहाउंडला नक्षलवाद्यांच्या हालचालींविषयी माहिती मिळाली होती. 43 सशस्त्र नक्षलवादी संबंधित भागात असल्याची माहिती कळल्यावर छत्तीसगडच्या बिजापूर आणि तेलंगणाच्या मुलुगु जंगलांमध्ये मोहीम हाती घेण्यात आली. बिजापूर येथून रिझर्व्ह गार्ड तसेच सीआरपीएफचे एक संयुक्त पथकही या भागात पोहोचले.
ग्रेहाउंड्सच्या पथकाची सेमलडोडी गाव (बिजापूर) आणि पेनुगोलू गाव (मुलुगू)नजीक एका जंगलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीनंतर 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. या चकमकीदरम्यान ग्रेहाउंड्स पथकाचा एक जवान देखील जखमी झाला. त्याला उपचारासाठी एअरलिफ्ट करून वारंगलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत नक्षलवाद्यांमध्ये नक्षली डिव्हिजन कमिटीचा सदस्य सुधाकर सामील आहे. त्याच्यावर 8 लाख रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते.