ऑनलाईन टीम / रायपूर :
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या शासकीय निवास्थाना बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निवसाबाहेर तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुढे ते म्हणाले, हा कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पश्चिम गेटच्या बाहेरील भागात ड्युटी करत होता. त्याचा मुख्यमंत्री निवास भागात येणाऱ्या जाणाऱ्यांशी किंवा निवासस्थानाच्या आतील भागात सुरक्षा देणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क येत नव्हता.
पुढे ते म्हणाले, संबंधित सुरक्षा कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील आतील भागात प्रवेश करत नव्हता. तरी पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियमांचे पालन केले जात आहे. संबंधित सुरक्षारक्षकाच्या संपर्कात आलेल्या जवळपास 21 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुरक्षा जवानांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे नाही आहेत. पण सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.