दोडामार्ग – वार्ताहर-
महाराष्ट्राचे व देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख व्हायला नको म्हणून नगरपंचायत उद्यानाला महाराजांचे नाव नको या भूमिकेशी मी कालच्या मासिक सभेत तसेच आजही ठाम आहे असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दै. तरुण भारत शी बोलताना स्पष्ट केले.
कालच्या सोमवारच्या मासिक सभेत नगरपंचायततर्फे उभारण्यात आलेल्या उद्यानाला कोणाचे नाव द्यावे यावरून वादळी चर्चा झाली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी या विषयावरून मतदान घेतले होते त्या अनुषंगाने श्री चव्हाण बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण देशवासियांना सार्थ अभिमान असून आम्हां भारतीयांचे ते आराध्य दैवत आहेत. नगरपंचायतच्या उद्यानाला त्यांचे नाव देणे हे कदाचित योग्य पण ठरले असते परंतु त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख व्हायला नको म्हणून मी हा विषय मतदानाला टाकला असेही श्री. चव्हाण म्हणाले. नगरपंचयातच्यावतीने शहरात लवकरच छत्रपतींच्या नावाने भव्य कलादालन उभारले जाणार असून हे कलादालन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव खास दालन ठरेल अशी ग्वाही देखील श्री. चव्हाण यांनी दिली.