प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यास मिळणार की नाही याची आस आता संपली आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बधांमधून कोल्हापूरसह 14 जिल्हे मुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशने आज गुरुवारपासूनच केएसए फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये फुटबॉल शौकिनांना प्रवेश देण्याला सुरुवातही केली आहे.
त्यामुळे दुपारी 4 वाजता प्रॅक्टीस फुटबॉल क्लब (अ) वि. दिलबहार तालीम मंडळ (ब) या संघांमध्ये होणारा सामना स्टेडियमच्या गॅलरीत बसून पाहता येणार आहे. स्टेडियमच्या पश्चिम गॅलरीसाठी 20 रुपये तर पूर्व गॅलरीसाठी 10 रुपये तिकीट असेल, असे केएसएच्या सुत्रांनी सांगितले. फुटबॉल शौकिनांकडून जिल्हा प्रशासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले जात आहेच. शिवाय अनेकांकडून सोशल मिडियाद्वारे आता सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये यायला लागतयं, असं आवाहन करणाऱया पोस्ट व्हायरल केल्या जात आहे.