विशाल कदम / सातारा :
सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. याच राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय भाड्याच्या खोलीत आहे. दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांना याच संग्रहालयाचे सहा हजार रुपयांचे भाडे द्यावे लागते. परंतु साताऱ्याच्या हजेरी माळावर संग्रहालयाची नवीन इमारत झाली. ही इमारत कोरोनाच्या साथीत जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तेथे जंबो हॉस्पिटल सुरू केले. हेच जंबो हॉस्पिटल कोरोना कमी झाल्यानंतर मुळ मालक म्हणजे पुरातत्व विभाग तथा छत्रपती शिवाज महाराज संग्रहालयाकडे सूपूर्द करणे गरजेचे आहे. परंतु जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून यासंदर्भात निर्णय होत नाही. त्यांच्या कार्यालयावर मजला चढवण्यात ते व्यस्त आहेत.
कोरोनाच्या जेव्हा कहर होता तेव्हा तातडीने रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या संग्रहालयाची इमारत हस्तांतरण करुन तेथे जंबो हॉस्पिटल सुरु केले. रुग्णांवर उपचारही सुरु केले. चांगले काम होत असल्याने त्यास कोणीही विरोध केला नाही. परंतु सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पहाता जंबोमध्ये रुग्ण नसल्याने व तेथे वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने पुरातत्व विभागाने इमारत ताब्यात द्यावी, याकरता पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला. परंतु सध्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून कोणताही रिप्लाय वा प्रतिसाद दिला जात नाही. त्यांचा निर्णय हा लालफितीत अडकला असून इमारत वापरली परंतु इमारत वापराचे कोणतेही भाडे संग्रहालयास दिले नाही. याच्याच उलट सध्या जेथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे ती इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात असून त्यासाठी महिन्याकाठी 6 हजार रुपयांचे भाडे पुरातत्व विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले जाते. यामुळे शासनामध्येही कसा दुजाभाव केला जातो याचे उदाहरणच सातारकरांना पहायला मिळत आहे.
सहा महिन्यांपासून लाईट बील थकले
शासकीय यंत्रणा कशी काम करते हे जंबोमध्ये अनेकदा झालेल्या प्रकारावरुन सातारकारंनी अनुभवले आहे. जंबो सुरु करण्यात आले तेव्हा लाईट महत्वाची होती. येथे लाईटचे कनेक्शन हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नावे करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जंबोचे लाईट बिल व्यवस्थित भरले गेले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून भरलेच गेले नसल्याने बिलाची रक्कम 30 लाख 92 हजार रुपये एवढे आले असून लाईट बिल भरावे, अन्यथा आपले कनेक्शन कट करण्यात येइल अशा आशयाच्या महावितरण कंपनीकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आता हे थकलेले बिल छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय कसे भरणार?, त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी हे लाईटबील जर भरले नाही तर महावितरण कंपनी लाईट कनेक्शन कट करणार आहे.
संग्रहालयाच्या इमारतीत वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याचा कट
जिल्हाधिकारी हे सतत दबावाखाली काम करत असतात. त्यांच्या कार्यालयाच्यावर मजला वाढवण्याचे काम वेगाने सुरु आहे. परिसरात ओढा अरुंद करुन सपाटीकरण करण्यात आले. परंतु संग्रहालयाच्या नवीन इमारतीतच नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा कट सध्या काही मंडळींकडून शिजत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या इमारतीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यास ही इमारत मिळवण्यासाठी पुरातत्व विभागास मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सध्या 3 कोटींचा निधी मंजूर असूनही इमारत ताब्यात नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय स्वतःच्या इमारतीत हलवता येत नाही.
शिवभक्त यासाठी आंदोलन छेडणार
ज्यावेळी कोरोना होता तेव्हा संग्रहालयाच्या इमारतीचा वापर जंबो रुग्णालय म्हणून करण्यास आमचा विरोध नव्हता. परंतु आता कोरोना कमी झाल्याने जंबोची मोकळी इमारत तशीच पडून राहण्यापेक्षा आणि ती वैद्यकिय महाविद्यालयास देण्याऐवजी संग्रहालयास परत करावी, अन्यथा आम्हा शिवभक्तांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा धर्मवीर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी दिला आहे.