सामान्य ग्राहकांच्या सोयीसाठी मासिक जमा योजना
प्रतिनिधी/ मडगाव
ज्वेलरी क्षेत्रात महाराष्ट्रातील ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन करुन यापूर्वीच गोव्यात प्रवेश केलेल्या ‘जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स’ ने सोमवारी मडगावात आपल्या गोव्यातील दुसऱया शोरुमचे उद्घाटन केले.
महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी या आस्थापनाचे मालक आदित्य पेडणेकर तसेच आनंद पेडणेकर, आसावरी पेडणेकर, अभिषेक पेडणेकर, व्यवस्थापक सागर हळदणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. लाड म्हणाले या ज्वेलरी दुकानात सामान्य ग्राहकांची आवड पूर्ण करणारे दागिने उपलब्ध असतील आणि हे आस्थापन मडगावकरांची अपेक्षा पूर्ण करणार अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्घाटनानंतर पत्रकारांबरोबर बोलताना या आस्थापनाच्या मडगाव शो -रुमचे मालक आदित्य पेडणेकर यांनी ‘ग्राहकांच्या पसंतीचे दागिने तयार करुन देणे हा आमचा हातखंड आहे आणि याचे कारण म्हणजे या सुवर्णपेढीकडे असलेला मुबलक प्रमाणात कारागीर. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने गुगलवर एखादा दागिना पाहिलेला असेल आणि त्या ग्राहकाने तो डिझायन दाखविला तर दोन ते तीन आठवडय़ात ग्राहकाला त्यांच्या मनपसंतीचा दागिना देऊ’ असे सांगितले.
दागिन्यांतील सोन्याच्या शुद्धतेसंबंधी बोलताना आदित्य पेडणेकर म्हणाले की या आस्थापनाकडे असलेले दागिने तीन वर्गात मोडणारे आहेत. पहिला वर्ग म्हणजे 99.99 टक्के शुद्ध मिळणारी सोन्याची नाणी. दुसरा वर्ग म्हणजे 22 कॅरेट शुद्धतेचे दागिने आणि तिसरा वर्ग म्हणजे हिरेजडीत दागिने. हिरा हा अत्यंत किंमती असल्यामुळे आणि तो हिरा कोणत्याही दागिन्यात दिमाखदारपणे आणि भक्कमपणे स्थिर व्हावा म्हणून त्याचे आसनही तितकेच भक्कम असावे लागते. 22 कॅरेटचे सोने हे तुलनेने काही प्रमाणात मऊ असल्यामुळे 18 कॅरेटच्या (शुद्धता 75 ते 80 टक्के) सोन्याच्या दागिन्यातच या लखलखत्या हिऱयाला विराजमान केले जाते.
सर्वसामान्य ग्राहक ते श्रीमंत ग्राहकाच्या पसंतीचे बव्हंशी दागिने या आस्थापनात उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहक आमच्याकडे सदोदीत आकर्षीत होतोय आणि म्हणूनच आतापर्यंत मडगावातील 15 व्या शाखेकडे आम्ही झेप घेतलेली असल्याचे आदित्य पेडणेकर यांनी सांगितले.
कलात्मक दागिन्यांवरील मजुरीसंबंधी बोलताना ते म्हणाले की काम साधे असेल तर 8 टक्केपर्यंत आणि कलाकुसरीच्या कामाची 22 टक्केपर्यंत मजुरी आकारतो. 20 टक्क्याहून अधिक मजुरी घेतलेले दागिने हे अत्यंत कलाकुसरीचे असतात. अशा प्रकारच्या दागिन्यांत कारागीर आपले कौशल्य ओतून दागिना तयार करीत असतो. आणि अशा प्रकारचे कलाकुसरीचे काम पाहुन ग्राहकही मजुरीकडे पाहात नसतो हा आपला अनुभव असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी भारत सरकारने ‘केव्हायसी’ आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्याचा संदर्भ घेऊन आदित्य पेडणेकर म्हणाले की ‘केव्हायसी’ पूर्ण करुन घेतलेले दागिने हे ग्राहकांच्याच फायद्याचे असते आणि म्हणून भारत सरकारच्या नियमांचे आम्ही पालनच करतो.
सुमारे 60 वर्षे जुनी असलेल्या जगन्नाथ पेडणेकर या आस्थापनाने आपल्या सन्माननीय ग्राहकांसाठी एक योजना जाहीर केलेली असून या योजनेअंतर्गत ग्रहकाने फक्त 10 महिने एखादी विशिष्ट रक्कम दरमहा भरली तर 11 व्या महिन्यात भरणाऱया रकमेइतकाच बोनस दिला जातो व 12 व्या महिन्यात ग्राहकाला सोन्याचा दागिना नेता येतो, अशी माहिती दिली.
आमच्याकडे घेतलेला दागिना पुन्हा एक्चेंच करण्यासाठी आणलाय तर त्या दागिन्यांचे वजन कमी केले जात नाही व त्या वजनाच्या बदल्यात दुसरा दागिना दिला जातो. मात्र, त्या दागिन्यांच्या बदल्यात रक्कम हवी असल्यास थोडी टक्केवारी कापून ग्राहकांच्या खात्यात उर्वरित रक्कम पाठवली जाते अशीही माहिती आदित्य पेडणेकर यांनी दिली.