ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या चार कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जगात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 93 हजार 885जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 11 लाख 09 हजार 249 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी जगभरात 4 लाख 13 हजार 206 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 6190 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 3.95 लाख बाधितांपैकी 2 कोटी 96 लाख 28 हजार 928 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 88 लाख 25 हजार 708 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 71 हजार 469 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 82 लाख 88 हजार 278 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 53 लाख 95 हजार 401 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 23 हजार 644 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 74 लाख 32 हजार 680 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 65 लाख 24 हजार 595 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 13 हजार 032 जणांचा मृत्यू झाला आहे.