यूसुगावर होते 43 कोटींचे इनाम , कोलंबियाच्या अध्यक्षांकडून कारवाईची घोषणा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
कोलंबियात मोस्ट वाँटेड गुन्हेगारांमध्ये सामील आणि देशातील मोठय़ा अमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा क्रूर म्होरक्या डायरो एंटोनियो यूसुगा उर्फ ओटोनियल याला तेथील सैन्यदलांनी जेरबंद केले आहे. कोलंबियाचे अध्यक्ष इवाक डय़ूक यांनी याची माहिती दिली आहे. कोलंबियाने यूसुगाविषयी माहिती देणाऱयास 8 लाख डॉलर्स (सुमारे 6 कोटी रुपये) आणि अमेरिकेने 50 लाख डॉलर्सच्या (सुमारे 37 कोटी रुपये) इनामाची घोषणा केली होती. यूसुगाने दरवर्षी सुमारे 200 टन कोकेनची तस्करी केली आहे. तसेच तो कोलंबियाच्या 200 हून अधिक जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.
50 वर्षीय यूसुगा कोलंबियातील हिंसक ड्रग्ज तस्करी टोळी ‘क्लान डेल गोल्फो’चा म्होरक्या असून सैन्य आणि पोलीस दोघांकडून त्याचा शोध घेतला जात होता. कोकेनच्या तस्करीसाठी ही टोळी अमेरिकेच्या निशाण्यावर देखील राहिली आहे. अध्यक्ष डय़ूक यांनी यूसुगाला जगातील सर्वात क्रूर ड्रग्ज तस्कर ठरवत त्याला अनेक पोलीस अधिकारी, सैनिक आणि राजकीय नेत्यांच्या हत्येसाठी जबाबदार ठरविले आहे.
आमच्या देशात या शतकात अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्याच्या दिशेने हा सर्वात कठोर प्रहार आहे. याची तुलना केवळ 1990 मध्ये पाब्लो एस्कोबारच्या पतनाशीच केली जाऊ शकते असे डय़ूक यांनी देशाला संबोधित करताना म्हटले आहे.
राष्ट्रीय पोलिसांनुसार यूसुगाला दुर्गम डोंगराळ भागातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान 34 वर्षीय एका अधिकाऱयाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने यूसुगाला शस्त्रधारी आणि अत्यंत हिंसक टोळीचा म्होरक्या ठरविले आहे, ज्यात दहशतवादी गटाचे सदस्य देखील सामील आहेत. क्लान डेल गोल्फो ही टोळी अमली पदार्थांची तस्करी, कोकेन निर्मितीच्या प्रयोगशाळा आणि गुप्त धावपट्टय़ांवर नियंत्रणासाठी हिंसा आणि धमकाविण्याच्या मार्गांचा वापर करत असल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने सांगितले आहे.
महत्त्वाची माहिती मिळणार
ही टोळी अलिकडच्या काळात धोकादायक ठरली होती. या टोळीने अनेक टन कोकेन देशात तसेच अमेरिका आणि युरोपमध्ये वितरित केले होते. यूसुगाने चौकशीत स्वतःचे तोंड उघडल्यास त्याच्या टोळीच्या अंतर्गत कामकाजाविषयी कोलंबिया सरकारला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळू शकते असे कोलंबियाचे संरक्षणमंत्री डिएगो मोलानो यांनी म्हटले आहे.
दरवर्षी 200 टन कोकेनची तस्करी
अटकेनंतर यूसुगाने तुम्ही मला मारहाण करा असे सुरक्षा दलांना सांगितले होते. त्याच्या अटकेसाठी एंटीओकिया प्रांतात चाललेल्या मोहिमेत कोलंबियाच्या विशेष सुरक्षा दलाचे 500 जवान आणि 22 हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. देशाच्या 32 प्रांतांपैकी 12 ठिकाणी त्याच्या टोळीच्या कारवाया सुरू आहेत असून यात सुमारे 3,800 सदस्य आहेत.