केवळ 43 दिवसांमध्ये 1 कोटी रुग्णांची भर : अमेरिका, ब्राझील, भारतातच 50 टक्के रुग्ण
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2 कोटीच्या पार पोहोचला आहे. 31 डिसेंबर रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यावर 1 कोटी रुग्णसंख्या होण्यास 180 दिवस लागले होते. तर केवळ 43 दिवसातच 1 कोटीवरून 2 कोटीवर हा आकडा पोहोचला आहे. एकूण रुग्णांपैकी अमेरिका, ब्राझील आणि भारतातच 50 टक्के म्हणजे 1 कोटीपेक्षा अधिक रुग्ण आहेत.
उत्तर अमेरिका खंड
जगात सध्या सर्वाधिक संक्रमित खंड उत्तर अमेरिका आहे. तेथे 60 लाख 62 हजार 62 हजार 281 रुग्ण सापडले आहेत. यातील 32 लाख 30 हजार 863 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 लाख 33 हजार 895 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे 85 टक्के रुग्ण एकटय़ा अमेरिकेतच सापडले आहेत.
दक्षिण अमेरिका खंड
दक्षिण अमेरिका खंडात आतापर्यंत 47 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. यातील 20 लाख 94 हजार 293 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 58 हजार 387 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये 30 लाख 13 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.
आशिया खंड
आशिया खंडात 49 लाख 57 हजार 753 रुग्ण आहेत. यातील 43 टक्के रुग्ण भारतातील आहेत. भारतात 21 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर आशियात आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक बाधित दगावले आहेत. भारतानंतर सर्वाधिक 3 लाख 24 हजार रुग्ण इराणमध्ये सापडले आहेत.
युरोप खंड
युरोपमध्ये 30 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील 18 लाख 16 हजार 547 रुग्णांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. तर 2 लाख 5 हजार 948 जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च ते मे यादरम्यान स्पेन, इटली आणि फ्रान्समध्ये सर्वात वेगाने रुग्णसंख्या वाढली होती. परंतु सद्यकाळात सर्वाधिक संक्रमित देश रशिया आहे. तेथे 8 लाख 82 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.
आफ्रिका खंड
आफ्रिकेत कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पार पोहोचली आहे. तेथील 4 लाख बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. तर सुमारे 23 हजार बाधितांचा मृत्यू झाला आहे. खंडात दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक संसर्ग पसरला आहे. दक्षिण आफ्रिकेत 5.53 लाख बाधित सापडले आहेत. महामारी आफ्रिका खंडाच्या विकासासाठी मोठा धोका आहे. या महामारीमुळे कोटय़वधी लोक दारिद्रय़ात लोटले जाऊ शकतात अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.
निर्बंधांवर अध्यक्षांची टीका
ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी देशातील बळींचा आकडा 1 लाखाच्या पुढे पोहोचल्यावर टाळेबंदीच्या नियमांवर टीका केली आहे. त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलद्वारे डेली मेलचा एक लेख प्रसारित केला आहे. 23 मार्चपासून 1 मेदरम्यान 16 हजार लोकांचा मृत्यू टाळेबंदीमुळे रुग्णालयात पोहोचू न शकल्याने झाल्याचे लेखात नमूद आहे. देशातील सर्वात लोकप्रिय वृत्तवाहिनीवर लोकांमध्ये भीती पसरविल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जपान : 1492 नवे रुग्ण
जपानमध्ये दिवसभरात 1492 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. याचबरोबर देशातील रुग्णसंख्या वाढून 48 हजार 702 झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्या रुग्णांमध्ये 331 जण राजधानी टोकियोत आढळून आले आहेत. मागील 24 तासांमध्ये 7 जणांचा मृत्यू ओढवल्याने बळींचा आकडा 1,060 झाला आहे. देशात पुन्हा आणीबाणी लागू केली जाणार नसल्याचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी स्पष्ट केले आहे.
इस्रायलमध्ये महागडा मास्क
किंमत 11,00,00,000
इस्रायलमध्ये जगातील सर्वात महागडा मास्क तयार केला जात आहे. या मास्कची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 11 कोटी रुपयांपेक्षाही अधिक राहू शकते. सोने-हिऱयाने तयार होणाऱया या मास्कमध्ये एन-99 फिल्टरही लावलेला असणार आहे. 18 कॅरेट सोन्याने तयार झालेल्या या मास्कमध्ये 3,600 काळे तसेच पांढरे हिरे आणि एन-99 फिल्टर लावला जाणार आहे. एका खरेदीदाराच्या मागणीवर त्याची निर्मिती सुरू आहे.
अर्जेंटीना : 70 टक्के संसर्गमुक्त
अर्जेंटीनात 70 टक्के रुग्णांनी कोरोना महामारीवर मात केली आहे. देशात एकूण 2 लाख 41 हजार 811 जणांचा चाचणी अहवाल होकारात्मक आला होता. यातील 1 लाख 70 हजार 109 रुग्ण आता बरे झाले आहेत. तर देशात आतापर्यंत 4,556 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दुरावलेल्या दांपत्यांसाठी स्वीट हार्ट व्हिसा
कोरोना विषाणूने जगाच्या अनेक हिस्स्यांना परस्परांपासून वेगळे केले आहे. विवाहित लोकही दुरावले असून आतापर्यंत भेटू शकलेले नाहीत. अशाप्रकारची अनेक प्रियकर-प्रेयसी टाळेबंदी पूर्णपणे हटण्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु या दिशेने आता सर्वात पहिले पाऊल जर्मनीने उचलले आहे. अविवाहित म्हणजे लीव्ह इन रिलेशनमधील जोडीदारही जर्मनीत राहणाऱया स्वतःच्या जोडीदाराला भेटू शकतो. परंतु जोडप्यातील नातं दीर्घकाळापासून चालत आलेलं असावं अशी अट जर्मनीच्या गृह मंत्रालयाने ठेवली आहे. याकरता प्रेमी जोडप्याला एकाच घरात राहिल्याचा किंवा जर्मनीत परस्परांना भेटत राहिल्याचा पुरावा मंत्रालयासमोर सादर करावा लागणार आहे.
ब्रिटन : रुग्ण वाढले
ब्रिटनमध्ये जूननंतर पहिल्यांदाच मागील 24 तासांत 1 हजारपेक्षा अधिक बाधित सापडले आहेत. तर एका दिवसापूर्वी देशात 758 रुग्ण आढळले होते. वाढती रुग्णसंख्या पाहता सरकारने देशाच्या अनेक भागांमध्ये नवे निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटन सरकारने जुलैमध्ये इंग्लंड, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये हॉटेल, पब आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची अनुमती दिली होती.