फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस – केर्बरला पुन्हा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का, कॅनडाच्या रेऑनिकची माघार
वृत्तसंस्था/पॅरिस
रविवारपासून येथे सुरू झालेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांमधील जागतिक द्वितीय मानांकित जपानच्या नाओमी ओसाकाला पहिल्याच सामन्यात विजयासाठी संघर्ष करावा लागला तर जर्मनीच्या माजी अग्रमानांकित अँजेलिक केर्बरला पुन्हा एकदा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्क बसला. पेत्र क्विटोव्हानेही संघर्षपूर्ण विजय मिळवित दुसरी फेरी गाठली आहे. याशिवाय कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने माघार घेतल्याचे सांगण्यात आले.
ओसाकाने चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असल्या तरी येथील क्ले कोर्टवर तिला अद्याप यश मिळविता आलेले नाही. तिला येथे तिसऱया फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. या स्पर्धेआधी झालेल्या मादिद व रोम येथील क्ले कोर्टवरील स्पर्धांतही तिला प्रारंभीच्या टप्प्यातच बाहेर पडावे लागले. त्यामुळे क्ले कोर्टवरील फक्त तीन सामन्यांचा अनुभव घेऊन ती येथे उतरली आहे. यावेळी त्यात बदल करण्याच्या मोहिमेला सुरुवात करताना रोमानियाच्या पॅट्रिसिया मारिया टिगवर 6-4, 7-6 (7-4) अशी मात केली. या स्पर्धेत उतरण्याआधी ओसाकाने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषेद मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून भाग घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बरेच वादंगही निर्माण झाले. पण त्याचा कोणताही परिणाम तिने आपल्या खेळावर होऊ दिला नाही. पत्रकार परिषदेवर तिचा बहिष्कार असला तरी कोर्ट साईडला होणाऱया मुलाखतीत ती भाग घेत आहे.
23 वर्षीय ओसाका गेल्या वर्षी धोंडशिरेच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत भाग घेऊ शकली नव्हती. यावेळी तिने दीर्घ रॅलीत गुंतण्याचे टाळले आणि पॉवरफुल फटक्यांचा सढळ वापर करीत तिने पॅट्रेसियावर वर्चस्व राखले. फोरहँड व बॅकहँडवर विजयी फटके मारत तिने 5-2 अशी झटपट आघाडी घेतली. पण पॅट्रिसियानेही झुंज देत तिची आघाडी 4-5 अशी कमी करताना तीन सेटपॉईंटही वाचविले. ओसाकाने आपल्या सर्व्हिसवर गेम जिंकत सेटची आघाडी घेतली. दुसऱया सेटमध्ये दोघींचा तोडीस तोड खेळ झाला आणि पॅट्रिसियाने एक ब्रेकपॉईंट व मॅचपॉईंट वाचवत सेट टायब्रेकवर नेला. टायब्रेकरमध्ये बॅकहँड फटक्यावर ओसाकाने सेटसह सामना संपवत आगेकूच केली. तिची पुढील लढत रोमानियाच्याच ऍना बॉग्डनविरुद्ध होणार आहे. बॉग्डनने इटलीच्या एलिसाबेता कॉक्सियारेटोचा 6-1, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे.
केर्बर पुन्हा अपयशी
जर्मनीच्या माजी अग्रमानांकित केर्बरला मात्र या स्पर्धेत पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावे लागले. पात्रता फेरीतून आलेल्या युक्रेनच्या ऍनहेलिना कॅलिनिनाकडून तिला पहिल्याच फेरीत 6-2, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. केर्बरने अन्य तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा एकेकदा जिंकल्या आहेत. मात्र प्रेंच स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. यावरून क्ले कोर्टवर ती उत्तम खेळाडू असल्याचे म्हणता येणार नाही, हेच स्पष्ट होते. जागतिक क्रमवारीत ती सध्या 26 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत सलग तिसऱयांदा तिला पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली आहे तर गेल्या सहा प्रयत्नांत तिला पाचव्यांदा पहिली फेरी पार करण्यात अपयश आले आहे. ‘या सामन्यातून मी शिकण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. कारण गेल्या काही आठवडय़ात मी चांगले प्रदर्शन केले असून काही चांगले सामनेही खेळले आहेत. गेल्या काही आठवडय़ात मी क्ले कोर्टवर चांगली तयारी केली होती. पण ती पुरेशी ठरली नाही, असेच म्हणावे लागेल. मी आता ग्रसकोर्टवर होणाऱया विम्बल्डनवर लक्ष केंद्रित करणार आहे,’ असे केर्बर नंतर म्हणाली.
महिलांच्या अन्य सामन्यात पेत्र क्विटोव्हाने पात्रता फेरीतून आलेल्या ग्रीट मिनेनवर 6-7 (3-7), 7-6 (7-5), 6-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. इलेना व्हेस्निना किंवा ओल्गा गोवोर्टसोव्हा यापैकी एकीशी तिची पुढील लढत होईल. डॅनियली कॉलिन्सने वांग झियूचा 6-2, 4-6, 6-4 पराभव करून दुसरी फेरी गाठली.
पुरुष एकेरीत स्पेनच्या अँडय़ुअरने आपल्याच देशाच्या मारिओ व्हिलेला मार्टिनेझचा 6-4, 6-4, 6-2, गीडो पेलाने डॅनियल इलाही गॅलानचा 6-3, 7-6 (7-4), 7-5, फॅबिओ फॉगनिनीने ग्रेगोर बॅरेरेचा 6-4, 6-1, 6-4 असा पराभव करीत विजयी सलामी दिली. कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने मात्र स्पर्धेतून माघार घेतली असून त्याच्या जागी फ्रान्सिस्को सेरुन्डोलोला स्थान देण्यात आले आहे.