वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये लोक सध्या कोरोना विषाणूपेक्षाही अधिक रानटी अस्वलांच्या भीतीने त्रस्त आहेत. देशात मागील 6 महिन्यांच्या कालावधीत अस्वलांकडून 13 हजारांपेक्षा अधिक हल्ले झाले आहेत. हे प्रमाण 5 वर्षांमध्ये सर्वाधिक ठरले आहेत. तर सप्टेंबरपासून आतापर्यंत 65 जणांना या हल्ल्यांमुळे जीव गमवावा लागला आहे.
अस्वले आत जंगल सोडून शहराच्या दिशेने येत असून पिकांची नासाडी करत आहेत. परंतु त्रस्त शेतकऱयांनी अस्वलांपासून बचावाचा अनोखा उपाय शोधून काढला आहे. अस्वलांना पळवून लावण्यासाठी ते आता रोबोटिक प्राण्याचा वापर करत आहेत. सेंसरयुक्त रोबोटिकचा आवाज, लालबुंद डोळे आणि उघडलेला जबडा पाहून वन्यप्राणी पळ काढत आहेत. खऱया प्राण्याचा आभास व्हावा याकरता या रोबोटला वन्यप्राण्याचे कातडे पांघरण्यात आले आहे. तसेच हा स्वतःचे शिर 180 अंशाच्या कोनात फिरवू शकतो. हा रोबोटिक प्राणी सौरऊर्जेने कार्यान्वित होतो आणि सेंसर क्षेत्रात हालचाल झाली तरच तो प्रतिक्रिया देतो.