कोल्हापूर शहरासह 6 तालुक्यातील बाधितांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी / कोल्हापूर
नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरात प्रापंचिक साहित्याचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना `जमियम उलमा-ए-हिंद’च्या कोल्हापूरसह चार शाखांनी जीवनाश्यक वस्तूंची मदत देऊन मोठा आधार दिला. जिह्यातील तब्बल 15 हजार कुटुंबीयांना ही मदत देण्यात आली. मदत वाटपासाठी जमियत हिंदचे अनेक कार्यकर्ते गेल्या 12 दिवसांपासून परिश्रम घेत होते.
कोरोनाचे संकट थैमान घालत असतानाच महापूरासारख्या दुसऱया संकटाना जिह्यातील अनेक गावांमधील अनेक कुटुंबीयांचे प्रापंचिक साहित्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक कुटुंबे तर अक्षरशः देशोधडीला लागली. अशा परिस्थितीत दिल्लीतील जमियम उलमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना महमुद मदनी यांनी नुकसानीत गेलेल्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जमियम उलमा-ए-हिंदच्या कोल्हापूर शाखेने पुरग्रस्तांसाठी मदत जमवायला सुरुवात केली. याचवेळी भिंवडी, सोलापूर, जालना, बदनापूर येथील जमियम उलमा-ए-हिंदच्या शाखांनी धान्यासह जीवनाश्यक वस्तूंच्या स्वरूपात जमियम उलमा-ए-हिंदच्या कोल्हापूर शाखेकडे मदत पाठवून दिली.
शाखेच्या कार्यकर्त्यांनीही नुकसानीत गेलेल्या कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह करवीर, राधानगरी, कागल, शिरोळ, हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यातील वाड्या, वस्त्यांची पाहणी करुन तेथील 15 हजार कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट मदत म्हणून दिले. प्रत्येक किटमध्ये 10 किलो गुह, 5 किलो तांदुळ, 1 किलो साखर, 1 किलो डाळ, पावकिलो चहापूड, हळद 200 ग्रॅम, साबण, झाडू, खराटे, फिनॉईल, चटई व चादर आदी साहित्यांचा समावेश होता. हे साहित्य वाटपासाठी हातकणंगले येथील रामराव इंगवले हायस्कूलचे अध्यक्ष उदयराव इंगवले यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्धीकी, कोल्हापूर शाखेचे जिल्हाध्यक्ष इरफानखान कास्मी, सचिव इम्तियाज कासम पन्हाळकर, सहसचिव हाफिज जुबेर सर्जेखान, मौलाना अब्दुर रऊफ, मौलाना नाजीम, मौलाना सैफुल्ला, हुसेन भालदार, ताहिर शेख, इब्राहीम भालदार व आशिफ मुल्ला यांनी मदत पोहोच करण्यासाठी परिश्रम घेतले.