सातारा कोव्हिड डिफेंडर पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी/ सातारा
दररोज दोन हजारांच्या संख्येने बाधित वाढ होत असल्याने सातारा शहरातील कोव्हिड हॉस्पिटल्ससमोर रुग्णांसह नातेवाईकांच्या रांगा लागल्यात. या रुग्णांना दिलासा देण्याबाबत कोव्हिड डिफेंडरच्या व्हॉटसऍप ग्रुपने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तातडीने सूचना देत दिल्यानंतर यावर तातडीने हालचाली झाल्याने आता जम्बो कोव्हिड हॉस्पिटलमध्ये वेटिंग रुग्णांसाठी खास कक्ष, प्राथमिक तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जिल्हा कोव्हिड रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हाभरातील बाधित रुग्णांना उपचारासाठी आणण्यात येत आहे. मात्र, बाधितांची वाढलेल्या संख्येने व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसाठी वेटिंग लागू लागलेय. त्यामुळे जम्बो कोव्हिड हॉस्पिटलच्या बाहेर बाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या रांगा लागल्या आहेत. साताऱयातील सामाजिक संस्थांकडून तिथे रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण मोफत पुरवण्याचे काम सुरु आहे. मात्र, बाहेर कोठेही थांबणाऱया रुग्णांना तिथे प्राथमिक स्तरावर तपासणी, मार्गदर्शन मिळण्याबाबत कोव्हिड डिफेंडर ग्रुपवर चर्चा सुरु असताना या ग्रुपतर्फे संग्राम बर्गे यांनी ’तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना जम्बो हॉस्पिटलसमोर समोर शेकडो रुग्ण रुखडून पडत आहेत, अश्या वेळी आलेल्या रुग्ण व नातेवाईक यांना किमान स्तरावर प्रथमोपचार मिळावेत, भले बेड मिळायला उशीर होणार असेल तरी त्यांना किमान मार्गदर्शन व्हावे, याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याशी बोलण्यास सांगितले.
त्यानंतर कोव्हिड डिफेंडर ग्रुपने मांडलेलया सूचनेबाबत प्रभावळकर यांनी तातडीने पालकमंत्री पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली असता पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनास तिथे सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर तातडीने प्रशासनाची यंत्रणा हलली आणि बुधवारपासून जम्बो हॉस्पिटलच्या डाव्या बाजूस उभारण्यात आलेल्या एका शेडमध्ये वेटिंग रुग्णाची प्राथमिक तपासणी व उपचारांची सोय देखील दोन तज्ञ डॉक्टर्स नियुक्त करुन करण्यात येणार आहे. यामुळे कोव्हिड डिफेंडर ग्रुपने केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांचाही पुढाकार
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला सुचना केल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील तातडीने जम्बो हॉस्पिटलमधील या समस्येवर उपजिल्हाधिकाऱयांसमवेत कोव्हिड डिफेंडर ग्रुपच्या सदस्यासमवेत बैठक घेतली. यावेळी हॉस्पिटलतर्फे डॉ. दबडे उपस्थित होते. त्यांनी बुधवारपासून जम्बो हॉस्पिटलमध्ये वेटिंग रुग्णांसाठी शेडमध्ये प्राथमिक तपासणी, आवश्यकता असल्यास उपचार तसेच मार्गदर्शन करण्यात येणार असून आतील मध्यवर्ती पेसेज मध्ये 20 बेड लावून तिथे ट्रीटमेंट देणार असल्याचे सांगितले.
आता बाधित रुग्णांना मिळणार दिलासा
कोव्हिड डिफेंडर ग्रुप, तरुण भारत ने पाठपुरावा केल्यामुळे बुधवारपासून जम्बो कोव्हिड रुग्णालयासमोरील रांगा लागण्याचे बंद होणार असून रुग्णांना तेथील बाहेरील बाजूस शेडमध्ये तज्ञ डॉक्टर्सकडून प्राथमिक तपासणी व तातडीने मार्गदर्शन मिळणार असून आवश्यता भासल्यास उपचार देखील करण्यात येणार आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटल्सची वेटिंग लिस्ट दिवसातून दोन वेळा अपडेट करण्यात येणार असल्याने बेडबाबतची नेमकी स्थितीही सर्वांना कळणार आहे.