वृत्तसंस्था / जम्मू-काश्मीर :
येथील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक उडाली. सडेतोड उत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात हिजबुल संघटनेचा म्होरक्याही होता, अशी माहिती येथील आयजीपी विजय कुमार यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी व नागरिकांसह पोलिसांवर हल्ला करण्याचे सत्र सुरुच आहे. रविवारी या कटाचा भाग असणाऱया तिघा दहशतवाद्यांची माहिती स्थानिक पोलिसांना व सुरक्षा दलास मिळाली. त्राल या गावात शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी समर्पण न करता जवानांवर गोळीबार सुरू केला. सतर्क जवानांनी यास सडेतोड उत्तर दिले. बराच काळ सुरू राहिलेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. मृत दहशतवादी हिजबुल व जैश संघटनेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.