- एक दहशतवादी ठार
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू – काश्मीरमधील राजौरी जिह्यातील थानामंडी शहरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. थानामंडीच्या जंगल परिसरात दहशतवादी असल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा दलांनी जंगलाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली आणि भारतीय जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे कनिष्ठ कमिशन अधिकारी शहीद झाले आहेत. तर सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील एका दहशतवाद्याला ठार केले आहे.
राजौरीच्या पोलीस अधीक्षक शीमा नबी कसबा यांनी सांगितले की, थानामंडी शहरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरूवारी चकमक झाली. या चकमकीमध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या एका कमिशन अधिकाऱयाला गोळय़ा लागल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, 6 ऑगस्ट रोजी दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी याच परिसरात ठार केले होते. 6 ऑगस्ट रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये राजौरीमध्ये चकमक झाली होती.तर या आधी 3 ऑगस्ट रोजी ही जम्मू -काश्मीरच्या बांदीपोराच्या चांदाजी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याच्या मृत्यूची बातमी होती.