वृत्तसंस्था / तेहरान
भारताचे विदेश व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. रईसी यांचा गुरुवारी इराणचे अध्यक्ष म्हणून शपथविधी झाल्यानंतर त्यांनी चर्चा केलेले जयशंकर हे पहिलेच आंतरराष्ट्रीय नेते आहेत.
जयशंकर सध्या रशियाच्या दौऱयावर असून ते इराणमध्ये काही काळ थांबून रशियात गेले आहेत. इराणच्या अध्यक्षांबरोबर आपली सकारात्मक चर्चा झाली असून आपण त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा पोहोचविल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. रईसी यांच्या शपथविधी समारंभाला जयशंकर उपस्थित होते. रईसीहे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला अली खमेनी यांच्या नजीकचे मानले जातात. कट्टर नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
सध्या अफगाणिस्तानात अराजकसदृश परिस्थिती आहे. अशा वेळी भारत आणि इराण यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्तान आणि चीन यांचेही लक्ष आहे. तसेच रशियाही तेथील परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अफगाणिस्तानमध्ये भारताची तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असून या गुंतवणुकीची सुरक्षा हा भारताच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे.