कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती : साडे दहा एकरात 32 व्यापारी गाळे : शेतकरी बांधवांना सोयीस्कर
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून जवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून उभारलेल्या जय किसान भाजी मार्केटचा उद्घाटन समारंभ सोमवारी उत्साहात पार पडला. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष लिंगराज पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या नवीन भाजी मार्केटचे उद्घाटन झाले.
जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनने साधारण साडेदहा एकरात तब्बल 32 व्यापारी गाळे उभारले आहेत. या गाळेधारकांनी देखील आपापल्या दुकानात पुजा करून दुकानांचे उद्घाटन केले. यावेळी व्यापाऱयांचे नातेवाईक, पै पाहुणे उपस्थित होते.
शहरापासून जवळ आणि पुणे-बेंगळूर महामार्गाला लागून असलेल्या भाजी मार्केटचा शेतकऱयांना चांगला फायदा होईल, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
जय किसान होलसेल माजी मार्केटमध्ये उभारलेल्या 232 गाळय़ांमध्ये पाणी, वीज, शौचालय, प्रसाधनगृहे आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. याबरोबर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आणि शेतकऱयांना बियाणे, विविध कीटकनाशके व खते उपलब्ध होणार आहेत. यामुळे व्यापाऱयांबरोबर शेतकरी बांधवांना सोयीस्कर होणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष मोहन मन्नोळकर, करीमसाब बागवान, राम हावळ, मोहमद इक्बाल डोणी, उमेश पाटील, सुनील भोसले, संजय भावी, विश्व़नाथ पाटील, सुरेश हावळ, रियाज डोणी यासह व्यापारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.