नीरजचे मार्गदर्शक, बायो-मेकॅनिकल तज्ञ क्लॉज बार्टोनिएत्झ मायदेशी परतले, हॉन देखील छोटय़ा सुटीसाठी जर्मनीत दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नीरजला मार्गदर्शन करणारे जर्मनीचे बायो-मेकॅनिकल तज्ञ क्लॉज बार्टोनिएत्झ हे ओबेर्शलेटेनबॅच या आपल्या 130 लोकसंख्येच्या छोटय़ा खेडय़ात पोहोचले, त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत केले गेले आणि क्लॉज यांना यावेळी माहिती मिळाली की, नीरजने 7 ऑगस्ट रोजी टोकियोत ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले, त्यावेळी त्या सुवर्णपदकाचा जल्लोष केवळ भारतातच नव्हे तर जर्मनीतील ओबेर्शलॅटेनबॅच या खेडय़ात देखील साजरा झाला होता!
73 वर्षीय बायो-मेकॅनिकल तज्ञ क्लॉज हे विमानाने जर्मनीत दाखल झाले. त्यानंतर एका रेल्वेने ते पुढील प्रवासातील टप्प्याला पोहोचले आणि तेथून रस्ता मार्गाने आपल्या खेडय़ात दाखल झाले. 130 लोकसंख्या असलेल्या या गावातील नागरिक यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी येत राहिले, फोन खणखणत राहिला.
भारताचे भालाफेकीतील मुख्य प्रशिक्षक हॉन हे देखील जर्मनीचे असून ते ऱहेन्सबर्ग येथे आल्यानंतर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना भेटले. हॉन यांच्या गावाची लोकसंख्या अवघी 8 हजार आहे. मात्र, या नागरिकांनाही नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाचे बरेच अप्रूप राहिले आहे.
‘नीरजच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकामुळे त्याचे कष्ट सार्थकी लागले आहेत. मी भारतातील परिस्थिती पाहिली, त्यावेळी लक्षात आले की, येथे गुणवत्ता बरीच आहे. पण, प्रशिक्षकांची उणीव आहे. मी क्लॉज यांना भारतात पाचारण केले आणि त्यांनी ही जबाबदारी अतिशय चोख पार पाडली’, असे हॉन याप्रसंगी म्हणाले.
क्लॉज बार्टोनिएत्झ 1970 च्या दशकापासून प्रशिक्षण देण्यासाठी अनेक ठिकाणी फिरत राहिले आहेत तर एकवेळचे पूर्व जर्मन स्टार भालाफेकपटू हॉन यांनी स्वतःच एकदा 100 मीटर्सपेक्षा अधिकची फेक केली आहे. सध्या हे दोघेही ऑलिम्पिक संपन्न झाल्यानंतर मायदेशी परतले असून नीरज आता स्टार भालाफेकपटू झाला आहे, यात या दोघांचाही अर्थातच मोलाचा वाटा राहिला आहे.
क्लॉज बार्टोनिएत्झ आता सप्टेंबरअखेर भारतात परतणार तेथून ते 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल स्पर्धा व आशियाई स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाकांक्षी तयारी करवून घेण्यावर भर देणार आहेत. अर्थात, त्यापूर्वी क्लॉज आपल्या खेडय़ानजीक असलेल्या घनदाट जंगली भागाची सैर करणार आहेत व त्यानंतरच भारताकडे रवाना होणार आहेत.
भारत व जर्मनीतील सुवर्णजेत्यांमध्ये हा फरक!
जर्मनीतील या ग्रामवासियांनी नीरजचे भारतात जे जंगी स्वागत झाले, त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला, ते पाहिले आणि विजेत्यांचा भारतात कसा गौरव केला जातो, त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. नीरजला ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्यानंतर जवळपास 13.75 कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले गेले आहे. जर्मनीत ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलेल्या ऍथलिटना सर्वसाधारणपणे 17 लाख रुपये प्रदान केले गेले आहेत.