उक्कली गावावर शोककळा : कुडलसंगमच्या मृत्युंजय महास्वामीजींकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन
वार्ताहर /विजापूर
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेल्या विजापूर जिल्हय़ातील उक्कली येथील जवान काशीराय बोम्मनळ्ळी यांच्यावर रविवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी गावातून हुतात्मा जवानाच्या पार्थिवाची सजविलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बसवण बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील, कुडलसंगमचे मृत्युंजय स्वामीजी, माजी आमदार एस. के. भेळळुबी, जिल्हाधिकारी पी. सुनीलकुमार यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी ‘अमर रहे…’ अशी घोषणाबाजी सुरू असताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
विजापूर जिल्हय़ातील बसवन बागेवाडी तालुक्यातील काशीराय बोम्मनळ्ळी हे जवान दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले. जवानाच्या हौतात्म्याची बातमी कळताच कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते.
हुतात्मा जवान काशीराय बोम्मनळ्ळी यांचे पार्थिव श्रीनगर येथून शनिवारी रवाना झाले. श्रीनगर येथे लष्कराच्यावतीने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. श्रीनगर येथून पार्थिव बेळगावातील सांबरा विमानतळावर आल्यानंतर विजापूरकडे रवाना करण्यात आले. तत्पूर्वी बेळगाव येथे आमदार अनिल बेनके यांच्यासह लष्कराच्यावतीने पुष्पचक्र वाहण्यात आले. रविवारी दुपारी पार्थिवावर मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोम्मनळ्ळी हे 2006 मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक कन्या असा परिवार आहे.
उपचारादरम्यान अखेरचा श्वास
पुलवामा येथे शुक्रवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान गोळी लागल्यामुळे बोम्मनळ्ळी यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’ संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये निशाझ लोन उर्फ खिताब या एका डिस्ट्रिक्ट कमांडरचाही समावेश होता.