जिल्हा पोलीस प्रमुख आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षकांकडे ग्रामस्थांची धाव….
वारणानगर / प्रतिनिधी
जाखले ता. पन्हाळा येथे अवैद्य दारू धंद्यांना ऊत आला असून प्राथमिक शाळा, अंगणवाडी,सेवा सोसायटी, दूध संस्था ,ग्रामपंचायत परिसर यासारख्या सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विक्रीला ऊत आला असल्याने महिला वर्गासह सर्वसामान्य जनतेला प्रचंड उपद्रव होत असल्याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांचेकडे दिली असल्याची माहिती जाखले गावचे नागरिक फत्तेशिंग राजाराम खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जाखले गावात अवैध दारू व्यवसाय कित्येक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे.सध्या हा चोरटी दारू विक्रीचा व्यवसाय ग्रामपंचायतीपासून अवघ्या ३० फुटाच्या अंतरावर येऊन ठेपला असून गावाच्या मध्यवस्तीत बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी दुकाने, शाळा,अंगणवाडी ,विविध सहकारी संस्था ,ग्रामपंचायत परिसर अशा भरवस्तीत, आणि चक्क मंदिरासमोरच हे अवैध दारू धंद्याचे मायाजाल प्रचंड फोफावले असल्याने श्री खोत अधिक यानी सांगीतले. सर्वसामान्य जनता,लहान मुले, मुली व महिलांना याचा नाहक त्रास होत आहे. छोट्याशा या गावात एकुण पाच अवैध दारू विक्रीची दुकाने राजरोसपणे चालवली जातात. या अवैध दारू धंद्याला आजवर कोणीही थोपवू शकलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी अशा अवैध व्यवसायांना बंदी घालण्यात यावी अन्यथा याबाबत तिव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल असा इशाराही फत्तेसिंग खोत यांनी दिला आहे.