उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपने जाट समुदायाला स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम उत्तरप्रदेशमधील 253 जाट नेत्यांना बुधवारी भेटण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक पक्षाच्या एक दिग्गज जाट नेत्याच्या घरीच बोलाविण्यात आली आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीतही शाह यांनी जाट नेते विरेंद्र सिंह यांच्या घरी समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली होती आणि पश्चिम उत्तरप्रदेशात कमळ फुलले होते.
समाजवादी पक्ष आणि त्याच्या आघाडीत सामील राष्ट्रीय लोकदल यावेळी जाट-मुस्लीम मतपेढी तयार करून पश्चिम उत्तरप्रदेशात भाजपसमोरील आव्हान वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. पश्चिम उत्तरप्रदेशात अत्यंत प्रभावी जाट समुदाय प्रामुख्याने शेतीशी जोडलेला आहे. केंद्राकडून आणल्या गेलेल्या कृषी कायद्यांना या भागात तीव्र विरोध झाला. अशा स्थितीत पक्षाला 2014 आणि 2017 प्रमाणे समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागतेय.
पश्चिम उत्तरप्रदेशातूनच निवडणुकीला प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात येथे 10 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. मागील निवडणुकीत 312 जागा जिंकणाऱया भाजपसमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर सप छोटय़ा पक्षांच्या मदतीने सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे.