मनपा आयुक्त घाळी-पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
जाधवनगर येथील एनसीसीच्या मैदानावर गैरप्रकारांना ऊत आला आहे. त्या ठिकाणी काहीजण मद्य ढोसणे, गांजा ओढणे असे प्रकार करत आहेत. सायंकाळी 6 नंतर काही तरुण त्या ठिकाणी असा प्रकार करत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जाधवनगर परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
जाधवनगर परिसरामध्ये बेकायदेशीररित्या अनेक टपऱया सुरू केल्या आहेत. त्या ठिकाणी मांसाहारी पदार्थ तयार करून दिले जात आहेत. तसेच परिसरातील दुकानांमधून सिगारेट तसेच मॅगी असे पदार्थ घेऊन त्या मैदानात जाऊन मद्य पिणे, हुल्लडबाजी करणे असे प्रकार घडत आहेत. तेव्हा या परिसरातील दुकानदारांनादेखील समज द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
सायंकाळी 6 नंतर या परिसरात महिलांना तसेच नागरिकांना फिरणे कठीण झाले आहे. रात्री 1 वाजेपर्यंत हे सर्व प्रकार घडत असतात. एपीएमसी पोलीस स्थानक हद्दीमध्ये हे मैदान येते. तेव्हा एपीएमसी पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त ठेवावा, असेही निवेदनात म्हटले आहे. काही दुकानांसमोरच सिगारेट ओढत असल्यामुळे तेथून ये-जा करणाऱया महिला तसेच इतर कुटुंबांना त्याचा मोठा त्रास होत आहे.
गांजा, गुटखा घेऊन मैदानात बसणे, रस्त्यावरच सिगारेट फुंकणे याबाबत कोणीही विचारले तर त्यांच्याशी उद्धट बोलणे असे प्रकार घडत आहेत. तेंव्हा जाधवनगर परिसरात रात्रीच्यावेळी पोलिसांनी गस्त घालावी. संबंधित कायदा तोडणाऱयांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक संदीप जिरगेहाळ, भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे सुजित मुळगुंद, दीपक तरळे, कपिल पावसकर, प्रमोद जाधव, सुरेश चौगुलेसह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.