कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा घेणार शोध
आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक कोरोना विषाणू महामारीच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात चीनमध्ये जाणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन आरोग्य कार्यक्रमाच्या प्रमुखांनी दिली आहे. कोरोना विषाणू सर्वप्रथम डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात आढळून आला होता.
चीनमध्ये जाणाऱया पथकासाठी तेथे विलगीकरणाची व्यवस्था असेल, पथक वुहानमध्ये महामारीशी संबंधित स्थळांचे निरीक्षण करणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मानवात संक्रमणाचे प्रकरण समोर आले होते अशा मूळ ठिकाणी जाणे असणार आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक चिनी सहकाऱयांसोबत काम करणार आहे. पथक चिनी अधिकाऱयांच्या देखरेखीत नसणार आहे. जगात लसीकरण मोहिमेच्या प्रारंभाचा आनंद व्यक्त केला जावा, परंतु पुढील 3 ते 4 महिने कसोटीचे असल्याचे उद्गार डॉक्टर मायकल रेयान यांनी काढले आहेत.
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा शोध लावण्यासाठी चीन जागतिक आरोग्य संघटनेसोबत सहकार्य कायम ठेवण्यासाठी तयार आहे. कोरोना प्रकोपानंतर चीनने एक खुल्या, पारदर्शक आणि जबाबदार भूमिकेच्या अंतर्गत डब्ल्युएचओसोबत मिळून काम करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी केला आहे.