आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन दिवसांपूर्वी जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर गोळीबार केलेला आरोप अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याची पाठवणी सुरक्षित कोठडीत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. गुरुवारी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. पण तो अल्पवयीन असल्याने नियमानुसार त्याला पोलीस कोठडीत ठेवता येणार नसल्याने त्याला सुरक्षित कोठडी देण्यात आली आहे.
गुरुवारी या आरोपीने आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर पिस्तुलाने गोळीबार केला होता. त्यात शादाब फारुख हा विद्यार्थी जखमी झाला होता. गोळीबार केल्यानंतर त्याने तेथून काढता पाय घेतला होता. तसेच हवेत पिस्तुल सरसावून ‘ये लो आझादी’ अशा घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे.
आरोपी अल्पवयीन असल्याने गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांच्या सुधारगृहातील वास्तव्याची शिक्षा देण्यात येऊ शकते. तथापि, अनेक तज्ञांनी असा फायदा देण्याविरोधात मत व्यक्त केले आहे. गुन्हा मोठा असेल तर आरोपीला कमी वयाचा लाभ न देता तो प्रौढ आहे, असे समजूनच कारवाई करावी, अशी मागणी यापूर्वीपासून होत आहे. तथापि, आतापर्यंत ती कधीच मान्य करण्यात आलेली नाही. निर्भया प्रकरणातील एक आरोपीही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अत्यंत सौम्य शिक्षा करण्यात आली होती.