मुंबई/प्रतिनिधी
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने जावयाला अटक करत (ईडी) मोठा धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. जावयाच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असं मत अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील न्यायालयात असीम सरोदे हे एकनाथ खडसे यांच्याविरोधात ही केस लढवत आहेत. या प्रकरणाची जी उपलब्ध कागदपत्रं आहेत, त्यानुसार प्रथमदर्शी खडसे हे यात पूर्णतः दोषी असल्याचं मतही अॅड. सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.
पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. राष्ट्रवादीत प्रवेश करताना ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.