महानगरपालिकेने मागविल्या नव्याने निविदा : 18 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
जाहिरातीच्या माध्यमातून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे शहरातील जाहिरात फलक तसेच स्मार्ट बसथांब्यांवरील बॅकड्रॉप जाहिराती लावणे, विविध चौकात लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर जाहिराती लावणे, रस्त्याशेजारी जाहिराती लावणे आदींकरिता निविदा काढल्या होत्या. पण निविदेची रक्कम कोटीच्या घरात असल्याने निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता निविदेच्या रकमेत कपात करून नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत.
स्मार्ट बसथांब्यावर जाहिराती लावण्यासाठी तसेच डिजिटल फलकावर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 2 कोटी 34 लाखाची निविदा आणि साडेतीन लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची निविदा काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्वच निविदांसाठी कोटीच्या घरात रक्कम निश्चित करण्यात आली होती. सरकारी सूचनेनुसार जाहिरातीचे दर निश्चित करून निविदा मागविण्यात आल्या होत्या. तसेच निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अनामत रक्कम मोठय़ा प्रमाणात भरण्याची अट घालण्यात आली होती. परिणामी निविदा प्रक्रियेत कोणीच भाग घेतला नाही. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया बारगळली होती.
24 रोजी बोली
निविदेच्या रकमेत कपात करून महसूल विभागाने नव्याने निविदा मागविली आहे. निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी दि. 18 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर लिलाव प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होणार असून दि. 24 रोजी सकाळी 11 पासून बोलीला प्रारंभ होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी निश्चित केलेली रक्कम कोटीच्या घरात होती. मात्र यामध्ये कपात करण्यात आली असून लाखाच्या घरात करण्यात आली आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभणार का? याकडे लक्ष लागले आहे.
जाहिरातीचा तपशील | यापूर्वी मागविण्यात आलेल्या निविदेची रक्कम | नव्याने मागविण्यात आलेली निविदेची रक्कम |
39 स्मार्ट बसस्थानकांवर बॅकड्रॉप जाहिराती प्रसिद्ध करणे, डिजिटल फलक. | 2,34,00,000 व 2,04,00,000 | 39,00,000 |
कोल्हापूर क्रॉस, अशोक चौक, गोगटे चौक आणि गोवावेस चौकातील एलईडी स्क्रीनवर जाहिराती प्रसिद्ध करणे. | 1,44,00,000 | 48,00,000 |
मनपाच्या 48 ठिकाणी जाहिरात फलक प्रसिद्ध करणे. | 24,82,920 | 24,82,920 |
महानगरपालिका व्याप्तीमध्ये खासगी जागेतील 132 जाहिरात फलकांवर जाहिराती प्रसिद्ध करणे. | 39,71,880 | 39,71,880 |
लिंगराज कॉलेजसमोर पोलीस लाईनकडे जाणाऱया रस्त्यावर पार्किंग शुल्क आकारणे. | 4,39,668 | 2,93,112 |