रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुपारच्या भोजन, पाणी व्यवस्थेचे उचलले शिवधनुष्य : दररोज 250 नातेवाईकांची व्यवस्था
- दुपारी एक ते दोन या वेळेत शांतपणे सुरू असते काम
- रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळताहेत आशीर्वाद
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची रात्रीच्या भोजनाची व्यवस्था माणगाव दत्तमंदिर संस्थेने केल्यानंतर आता या नातेवाईकांच्या सकाळच्या भोजनासाठी ‘मिशन आधार’ या व्हॉटस्ऍप् ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेतला आहे. गेले बारा दिवस दररोज 250 लोकांना भोजन व पाणी पुरवत या युवकांनी या संकट काळात समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.
वेगवेगळ्य़ा नोकरी-धंद्यात व्यस्त असलेल्या जिल्हय़ातील या युवकांनी कोविड संकट काळात एक सामाजिक बांधिलकी म्हणून कोविडग्रस्तांसाठी मदतकार्य उभे करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या युवकांनी एकत्र येत एक व्हॉटस्ऍप् ग्रुप तयार केला. या ग्रुपचे नाव ‘मिशन आधार’ असे ठेवण्यात आले. पहिले काही दिवस अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या ग्रुपला माणसे जोडण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाने जमेल तशी आर्थिक मदत करीत निधी उभारण्यास सुरुवात केली. सुरुवातीस जमा होणाऱया या मदतीतून काही कोविड सेंटर्सना ‘ऑक्सिजन फ्लो मिटर्स’ देण्याचे ठरविण्यात आले. परंतु, त्यानंतर या ग्रुपच्या सदस्यांनी जेव्हा जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट दिली, तेव्हा त्यांना या रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांच्या नातेवाईकांची नाष्टा-भोजनाअभावी होणारी फरफट पाहिली. लॉकडाऊन असल्यामुळे एक कॅन्टिन वगळता भोजनाची जवळपास कुठलीही सोय नसल्याचे, त्याचप्रमाणे पिण्याच्या शुद्ध पाण्याचीही या परिसरात सोय नसल्याचे या सदस्यांना आढळून आले. त्यामुळे या रुग्णालयातील नातेवाईकांसाठी मोफत भोजन व पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काऊंटरची मदत घेतली. त्यांच्या सहकार्यातून त्यांनी मोफत अन्नदान व पाणीदानाचा उपक्रम सुरू केला.
शिस्तबद्ध, आदर्श काम
गेले बारा दिवस ‘मिशन आधार’ ग्रुपचे हे युवक अतिशय शिस्तबद्धपणे हे कार्य तडीस नेत आहेत. आपला नोकरी-धंदा सांभाळत अगदी बरोबर 12.30 ते 2.00 या वेळेत पॅक केलेले भोजन व पाण्याच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो घेऊन हे सर्व युवक अगदी पाळय़ा लावून जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. तेवढय़ाच शिस्तबद्ध पद्धतीने भोजन व पाण्याचे वाटप करतात. या युवामंडळींचा आणखी एक आदर्श म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांना पुरविण्यात येणारे हे भोजन हे कुणा हॉटेलवाल्यांकडून बनवून घेण्याऐवजी, लॉकडाऊनमुळे ज्याचे खूप नुकसान झाले अशा माणसाकडून बनवून घेत त्याला रोजगाराचा एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
आपली सामाजिक बांधिलकी ओळखून या कोविडच्या महासंकटात मदत कार्यासाठी झोकून दिलेल्या ‘मिशन आधार’च्या या युवा मंडळीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मदतीचे आवाहन
खरं तर या मिशन आधार ग्रुपने काही ठराविक दिवसांसाठीच हे कार्य हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता बारा दिवस होऊन गेले. आणखी किती काळ हे संकट राहील, सांगता येणार नाही. अजून किमान आठ दिवस तरी दररोज 250 जणांच्या भोजनाची सोय होईल, एवढा निधी उपलब्ध आहे. परंतु, त्यानंतर आर्थिक मदतीची गरज लागण्याची शक्यता आहे. त्यांना या कार्यात सहभागी व्हायचे आहे वा या कार्यासाठी आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी 9764001550 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन या ‘मिशन आधार’ तर्फे करण्यात आले आहे.