प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होत असून या निवडणुकीसाठी शिवसेना (महाविकास आघाडी) व भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सोसायटय़ांचे मतदान अधिकाराचे ठराव घेण्यात येत आहेत. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्हीकडून अंतर्गत पातळीवर जोरदार तयारी करण्यात येत असल्याने ही निवडणूक यावर्षी रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शिवसेनेकडून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशी एकत्रित आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार असल्याचे समजते. या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप अशीच निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्हीकडून जिल्हा बँकेवर ताबा मिळविण्याच्या अनुषंगाने अंतर्गत पातळीवर फिल्डिंग लावली जात आहे.
सद्यस्थितीत गावपातळीवरील विकास सोसायटय़ांचे मतदान अधिकाराचे ठराव चेअरमन, संचालक तसेच थकित सोसायटय़ांचे ठराव विश्वासू सदस्यांना देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संस्थागटातून उमेदवारांसाठीची चाचपणी दोन्हीकडून सुरू करण्यात आली आहे. त्यातच तालुक्यात संस्था थकितमध्ये अधिक असल्याने तेथील संचालकांना निवडणूक लढता येणे कठीण असल्याने पर्यायी विचारही सुरू करण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे एकूण स्थितीचा विचार करता यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.