प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा बँक निवणुकीसाठी मातोश्रीवरुन शिवसेनेच्या पाच नावांची शिफारस केली आहे. दुपारी एक वाजता खासदार संजय मंडलिक यांना दूरध्वनीवरुन नावांची यादी पाठवण्यात आली आहे. विद्यमान दोन अधिक तीन जागा अशा इतर गटातील पाच जागांचा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे दुपारी चार वाजता आघाडीच्या नेत्यांच्या होत असलेल्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
प्रक्रिया गटातून विद्यामान संचालक संजय मंडलिक, महिला मधून निवेदिता माने, गंधालीदेवी कुपेकर अथवा ओबीसीमधून संग्राम कुपेकर, पतसंस्था गटाकडून आमदार प्रकाश आबीटकर यांचे बंधू प्रा. अर्जुन आबीटकर, आणि माजी आमदार चंद्रदीप नरके गटासाठी एक अशा पाच जागांची यादी मातोश्रीवरुन पाठवण्यात आली आहे. चार दिवसापूर्वी संपर्क प्रमुख अर्जुन दुधवडकर यांनी प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. यावेळी सन्मानजनक तोडगा न निघाल्यास निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत सेनेच्या पदरात काय पडते याकडे लक्ष लागले आहे.