कोल्हापूर / कृष्णात चौगले
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तरीही इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. विकास संस्था गटातील 12 जागांवर निवडणूक लढविणाऱया नेत्यांनी सहा महिन्यांपूर्वीच स्वबळावर ठरावांची गोळाबेरीज केली असून ठरावधारकांना `लक्ष्मीदर्शन’ घडवले आहे. काहींनी देवाच्या साक्षीने त्यांच्याकडून मतदानाचे अभिवचन घेतले आहे. त्यामुळे विकास गटातील बहुसंख्य नेत्यांकडे विजयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्या इतकी मतसंख्या तयार आहे. पण उर्वरित गटातील 9 जागांसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे. तरीही उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते असणारी बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. गेल्या पाच वर्षात या बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या नवनवीन योजना राबविण्यात आल्या. बिगरशेती कर्जांच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे उभा केले. राजकीय दृष्टीकोनातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा बँक एक महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे या बँकेच्या संचालक मंडळात जाण्यासाठी जिह्यातील प्रमुख नेतेमंडळीनी सर्वतोपरी तयारी सुरु केली आहे.
करवीरमध्ये पी.एन.पाटील यांचे वर्चस्व
विकास संस्थांची सर्वाधिक 251 संख्या असलेल्या करवीर तालुक्यातून आमदार पी.एन.पाटील यांच्यासाठी त्यांचे चिरंजीव जि.प.चे अध्यक्ष राहुल पाटील व राजेश पाटील यांच्याकडून तालुक्यात दौरे सुरु आहेत. एकूण ठरावांपैकी त्यांच्याकडे 60 ते 65 टक्के ठराव असल्याचे समजते. पण करवीरमधील काँग्रेसच्या विद्यमान संचालिका उदयानी साळुंखे यांच्या उमेदवारीबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.
राधानगरीमध्ये ए.वाय. पाटील आघाडीवर
विद्यामान संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी संस्था गटाकडून जय्यत तयारी केली आहे. या गटातून शिवसेनेचे अरुण जाधव, काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांनीही तयारी सुरु केली आहे. पण ठरावांच्या बेरजेच्या राजकारणात सद्यस्थितीत ए.वाय.पाटील आघाडीवर आहेत. तर आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जून आबिटकर यांनी पतसंस्था गटातून आपली पूर्णपणे तयारी केली आहे.
शाहूवाडीत सर्जेराव पाटील विरुध्द मानसिंगराव गायकवाड यांच्यात लढत
शाहूवाडी तालुक्यातील विद्यमान सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर यांच्याविरोधात मानसिंगराव गायकवाड यांची निकराची लढत होणार आहे. गत निवडणुकीत मानसिंगराव गायकवाड यांचा केवळ दोन मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही परिस्थिती बाजी मारायची असा चंग गायकवाड यांनी बांधला आहे. चिरंजीव रणवीर गायकवाड यांच्या उमेदवारीची ते घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. आमदार विनय कोरे सर्जेराव पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. तर गायकवाड यांना माजी आमदार सत्यजित पाटील यांची साथ आहे.
हातकणंगलेमधून महादेवराव महाडिकांच्या विरोधातील उमेदवार कोण ?
सद्यस्थितीत भाजपशी जवळीक असलेले महादेवराव महाडिक यांनी विकास संस्था गटातून बहुसंख्य ठरावांची मोट बांधली आहे. पण महाविकास आघाडीकडून त्यांच्याविरोधात उमेदवार कोण देणार ? हे अद्याप निश्चित नाही. याच तालुक्यातून राखीव महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने तर अनुसुचित जाती-जमाती गटातून आमदार राजू आवळे, राष्ट्रवादीचे राजीव आवळे, जि.प.सदस्य अशोकराव माने यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे.
शिरोळमध्ये मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांची परिपूर्ण मोर्चेबांधणी
शिरोळ तालुक्यातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ठरावधारकांकडून सहा महिन्यापूर्वीच मतदानाचे अभिवचन घेतले आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले सर्वपक्षीय उमेदवार दत्त शिरोळ साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण त्यांच्याकडे असणाऱया ठरावांची संख्या पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांना माघार घेण्याची विनंती केली जाऊ शकते. त्यांना महामंडळावर घेण्याची ग्वाही देऊन यड्रावकरांचा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या राजकारणात यड्रावकरांची मदत महत्वाची असल्यामुळे या राजकीय घडामोडी होऊ शकतात.
चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील यांचा वरचष्मा
चंदगड तालुक्यात विकास संस्था गटातून आमदार राजेश पाटील यांचा वरचष्मा आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांची उमेदवारी असू शकते. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाल्यास काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांची राजेश पाटील यांना साथ मिळू शकते.
भुदरगडमध्ये माजी आमदार के.पी.पाटील यांचा दबदबा
भुदरगड तालुक्यात विकास संस्था गटातून माजी आमदार के.पी.पाटील यांच्याकडे विजयाचा गुलाल लावण्यासाठी पुरेशी ठरावसंख्या असल्याचे समजते. त्यांच्याविरोधात भाजपकडून बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहूल देसाई मैदानात उतरु शकतात.
आजऱ्यातून चराटी विरुद्द देसाई
आजरा तालुक्यातून विद्यमान अपक्ष संचालक अशोक चराटी यांच्या विरोधात जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राजाराम देसाई यांचे चिरंजीव सुधीर देसाई यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित होऊ शकते.
कागलमध्ये मुश्रीफ, माने, मंडलिक यांची चलती
कागल तालुक्यात संस्था गटातून ग्रामविकासमंत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, हसन मुश्रीफ यांनी विकास संस्थांच्या ठरावाच्या राजकारणात आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. तर प्रक्रिया संस्था गटातून संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, आणि प्रक्रिया संस्था गटातून खासदार संजय मंडलिक यांनी बहुसंख्य ठरावांची बेगमी केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात कागल तालुक्यातून तीन संचालकांची परंपरा कायम राहणार आहे.
पन्हाळ्यात आमदार विनय कोरे वरचढ
पन्हाळ्यातील विकास संस्था गटाच्या राजकारणात आमदार विनय कोरे वरचढ ठरणार आहेत. प्रक्रिया संस्था गटातून कोरे यांनी आपल्या संस्थेचा ठराव प्रदिप पाटील-भुयेकर यांच्या नावे दाखल केला आहे. या माध्यमातून कोरे यांनी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना अप्रत्यक्ष विरोध दर्शविल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना मंत्री मुश्रीफ यांची कसोटी लागणार आहे.
गगनबावडÎात पालकमंत्री सतेज पाटील यांचे पारडे जड
जिह्यातील सर्वात छोटा तालुका असलेल्या गगनबावडा तालुक्यातील विकास संस्था गटातील सर्वाधिक ठरावसंख्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पारंपारीक विरोधक पी.जी.शिंदे कोणती भूमिका घेतात याकडे शिंदे गटाचे लक्ष आहे.
अन्य गटांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला
विकास संस्था गट वगळता अन्य शेतीमाल प्रक्रिया, नागरी बँका, सेवक पतसंस्था, इतर शेती गटातील 4 व राखीव गटातील 5 अशा एकूण 9 जागांची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याच्या नेत्यांकडून हालचाली सुरु आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजप मैदानात उतरणार असले तरी त्यांना कितपत यश येणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.