उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार रमेश कत्ती यांची पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी ही निवड केली असून पुन्हा एकदा कत्ती बंधूंच्या हाती ही बँक आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, तीन जागांसाठी या बँकेची निवडणूक पार पडली होती. खानापूर, रामदुर्ग आणि विणकर सहकार संघ प्रतिनिधींमध्ये ही निवडणूक झाली होती. त्यामध्ये भाजपनेच बाजी मारली होती. त्यामुळे भाजपचाच संचालक अध्यक्ष बनणार हे निश्चित झाले होते.
शनिवारी या बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडणूक पार पडली. रमेश कत्ती यांना सर्वांनीच पाठिंबा दर्शविला. त्यामुळे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझी पाचव्यांदा या बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून बँकेच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डीसीसी बँक 100 टक्के नफ्यात राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रमेश कत्ती हे 1999 साली डीसीसी बँकेचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळी सोसायटीकडे 577 कोटी रुपये खेळते भांडवल होते. मात्र, आज या बँकेकडे 5 हजार 131 कोटी रुपये खेळते भांडवल असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या पाच वर्षांमध्ये त्यामध्ये दुपटीने वाढ करू, असेही रमेश कत्ती यांनी सांगितले.
जिल्हय़ाचे राजकारण ठरविणाऱया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवडणूक बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा कत्ती बंधूंनी या बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.