यामध्ये 34 आयसीयू बेड तर 166 ऑक्सिजन बेड : वॉर्ड स्थलांतराचे हे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी /सातारा
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या मुख्य इमारतीवर कोरोना व नॉन कोरोना रूग्णांच्या वॉर्ड व्यवस्थेचा मोठा ताण आहे. रूग्णालयाच्या आवारात महिला रूग्णालयाच्या इमारतीतच कोरोना रूग्णांसाठी दोनशे बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. वॉर्ड स्थलांतराचे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये 34 आयसीयू बेड तर 166 ऑक्सिजन बेड असणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात आणि दुसऱया टप्प्यात जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीत अकरा वॉर्डपैकी सात वॉर्डमध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी तीस बेड प्रमाणे 210 बेडची व्यवस्था करण्यात आली होती. या वॉर्डला 24 तास पुरवठा करणारा ऑक्सिजन प्लॉन्ट उभारण्यात आला. मात्र, आता कोरोनाचा धोका अद्याप टळला नसून संसर्गदर आवाक्यात आला आहे. त्यामुळे कोविड रूग्णांबरोबर नॉन कोविड रूग्णांना उपचार देण्याकरीता व्यवस्था करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. रूग्णालयाच्या परिसरातील महिला रूग्णालयाच्या इमारतीत पहिल्या कोरोना कक्ष स्थलांतरीत होणार आहे. या इमारतीसाठी सुद्धा प्रतिमिनिट एक हजार केव्ही ऑक्सिजन पुरवणाऱया प्लॅन्टची व्यवस्था होणार आहे. या स्थलांतरामुळे मुख्य इमारतीत आयसीयू कक्षाचा ताण कमी होणार असून अतितातडीच्या नॉन कोरोना रूग्णांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. महिलांच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया, भाजलेले रूग्ण, पुरूष शस्त्रक्रिया, प्रसूती कक्ष, लहान मुलांचे उपचार या विविध करणांसाठी किमान चार वॉर्ड उपलब्ध व्हावेत यासाठी मुख्य इमारतीतील कोरोना कक्ष टप्प्याटप्प्याने महिला रूग्णालयात स्थलांतरीत होणार आहे. शंभर बेडचे स्वतंत्र महिला रूग्णालय हा जिल्हा रूग्णालयाचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या हॉस्पिटलची इमारत उभारण्यात आली तरी अद्यायावत सुविधांच्या अभावी या इमारतीचे काम अद्याप अपूर्णच आहे. तिथेच कोरोना कक्ष स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाल्याने महिला रूग्णालयासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.