प्रतिनिधी / रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय डॉक्टरांअभावी ‘व्हेंटीलेटर’वर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 8 महिने पगारच मिळत नसल्याने 6 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱयांनी नोकरीला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे सिव्हीलमध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करणारे डॉ. प्रमोद सूर्यवंशी यांनीही राजीनामा दिला असून आणखी काही डॉक्टरही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे समजते.
सर्वसामान्य रूग्णांना नाममात्र शुल्कात रूग्णसेवा मिळावी यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयांची स्थापना झाली आहे. मात्र रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्या वर्ग 1 च्या मंजूर 19 पदांपैकी केवळ 3 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तर वर्ग दोनच्या 30 पैकी केवळ 12 पदेच भरली गेली आहेत. अनेकदा थेट मुलाखती घेऊन ही पदे भरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यातही फारसे यश आलेले नाही. अनेकदा डॉक्टर रूजू झाल्यानंतर काही काळातच नोकरी सोडत आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत.
जिल्हा रूग्णालयातील दररोज शेकडो रूग्ण विविध आजारांच्या उपचारासाठी येत असतात. मात्र सध्या या जिल्हा रूग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. नुकतेच रूग्णालयातील कंत्राटी पध्दतीवर असलेले 6 वैद्यकीय अधिकारी काम सोडून गेले आहेत. आरोग्य विभागाकडून गेले 8 महिने पगारच न झाल्याने ही परिस्थिती ओढवली. दुसरीकडे गेल्या सात-आठ वर्षापासून शासकीय रूग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून उत्तम काम पाहणारे डॉ. प्रमोद सूर्यवंशी यांनीही राजीनामा दिला आहे. रूग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी जिल्हा रूग्णालयाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सात-आठ वर्षापासून शासकीय रूग्णालयात कोणी नवीन डॉक्टर येत नाही. काही जण रूजू झाले तर 6 महिन्याच्या आत विविध कारणे देत राजीनामा देतात.
राज्याचा आरोग्य विभागाकडून होत असलेले दुर्लक्ष यामागील प्रमुख कारण आहे. डॉक्टरांचे पगार वेळच्या वेळी देणे, इतर समस्या सोडवणे यामध्ये म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. मात्र, आरोग्य विभाग पाहणीशिवाय दुसरे काही करत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयात विविध सोयी-सुविधा आहेत, मात्र या सुविधा चालवण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच नाहीत. सोनोग्राफी तज्ञ, फिजिशियन, भूलतज्ञ, स्त्राr रोग तज्ञ आदी वैद्यकीय अधिकाऱयांची आवश्यकता आहे. डॉ. खलाटे राजीनामा देवून पाच-सहा वर्षे झाली. त्यानंतर अद्यापही ही जागा कायमस्वरूपी भरली गेली नाही. मध्यंतरी एक वैद्यकीय अधिकारी हजर झाले होते, मात्र 6 महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.