नवे शिक्षणाधिकारी कारभार सुधारणार का?: कार्यालयातील कर्मचाऱयांसह येणाऱया शिक्षकांचीही गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाच्या कार्यालयात समस्यांचा डोंगर साचला आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच अंतर्गत व्यवस्थाही कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून महिला कर्मचाऱयांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. डेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होवून कार्यालयाच्या एका बाजूने वाहत आहे. नवीन जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबरोबरच कार्यालयीन कामकाज व व्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
क्लब रोड येथे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय आहे. या ठिकाणी शैक्षणिक जिल्हय़ातील शिक्षकांची नेहमी ये-जा असते. दररोज शेकडो शिक्षक कार्यालयीन कामकाजासाठी या ठिकाणी येतात. परंतु कार्यालयातील कर्मचाऱयांसह येणाऱया शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कार्यालयाच्या मागील बाजूस असणाऱया स्वच्छतागृहाचे दरवाजे निखळून पडले आहेत. वॉश बेसीनमधील नळ तुटून पडले आहेत. स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा तर प्रश्नच नाही. महिला स्वच्छतागृहाची अवस्था तर याहून बिकट आहे. जिल्हय़ाच्या शैक्षणिक कार्यालयाची जर ही अवस्था असेल तर तालुका पातळीवरील इतर कार्यालये व शाळांच्या अवस्थेचा विचार न केलेलाच बरा. दरवाजे निखळलेले असल्यामुळे त्या स्वच्छतागृहाचा क्वचितच वापर होत आहे.
सांडपाणी वाहतेय उघडय़ावर
कार्यालयाच्या एका बाजूने सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणी थेट मुख्य रस्त्यापर्यंत वाहत आहे. त्यामुळे अशा विविध समस्यांकडे नवे शिक्षणाधिकारी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणाधिकाऱयांनी शैक्षणिक जिल्हय़ात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या कार्यालयापासून सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.