सातारा / प्रतिनिधी :
कोरोनाचा कहर अद्याप कमी आलेला नाही. त्यातच आता कोरोना नंतरच्या म्युकरमायकोसिस या रोगाचा धोका वाढू लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला असून 28 जण बाधित आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार नुकतीच एक बैठक पार पडली. त्या बैठकीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक काढण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र म्युकरमायकोसिसचा कक्ष सुरु करण्यात आला आहे.
कोरोनाने अगोदरच अनेकांचे जीव रुग्णालयातच तडफडून जात आहेत. त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण होत असल्याचा निष्कर्ष पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात चिंतेचे वातावरण बनले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 28 रुग्ण म्युकरमायकोसिसचे आढळून आले. त्यामध्ये 9 रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील तर 21 रुग्ण हे खासगी रुग्णालयात आहेत. मृत्य झालेल्या तीन रुग्णांपैकी 2 हे जिल्हा रुग्णालयातील तर 1 रुग्ण हा खासगी रुग्णालयातील आहे. कोरोना बाधित झालेल्यांमध्ये हा बुरशीजन्य आजार वाढत असल्याचे समोर आल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक
म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने नुकतीच जिल्ह्यातील खासगी डॉक्टर, सरकारी डॉक्टर नाक-कान- घसा तज्ञ, डोळय़ाचे तज्ञ, पॅथॉलॉजीस्ट, फिजिशीयन यांची बैठक झाली. त्यामध्ये म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक सर्वच हॉस्पिट्लना गेले असून त्या आजारावरील रुग्ण आढळून आल्यास त्यांच्याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे कक्ष
म्युकरमायकोसिसचे या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कक्ष तयार केला आहे. त्याचप्रमाणे याच्या तपासणीसाठी जी बायोप्सी घ्यावी लागते, त्या बायोप्सीसाठी खासगी प्रॅक्टीशनरांची मदत घेणार आहोत. त्यांच्या मदतीने बायोप्सी घेवून त्याचे कन्फरमेशन करणार आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारची मॅनेजमेंट एक सर्जीकल आणि एक मेडिकल मॅनेजमेंट असते. मेडिकल मॅनेजमेंटसाठी लागणारे इंजेक्शन ऍम्पुटर बी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. त्याचा सप्लाय वेळोवेळी उपसंचालक कार्यालयाकडून होत असतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.