मनविसे जिल्हाध्यक्षांच्या मागणीला यश
प्रतिनिधी / मालवण:
जिल्हय़ात असणाऱया परप्रांतीय कामगारांची नोंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात परप्रांतीय कामगारांची नोंद बुधवारपासून सुरू झाल्याची माहिती मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली. पोलीस अधीक्षकांचा निर्णय योग्य असून मनसेतर्फे त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे गुन्हय़ांना आळा बसण्यास निश्चितच मदत होईल, असे म्हटले आहे.
विविध कामांसाठी जिल्हय़ात येणाऱया परप्रांतीय कामगारांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला परप्रांतीय कामगारांची नोंद करावी, अशी मागणी इब्रामपूरकर यांनी केली होती. आंतरराज्य स्थलांतरित कायदा 1979 ची अंमलबजावणी करा. आजही जिल्हय़ात परप्रांतीय मजूर, इमारत बांधकाम, वाळू व्यवसाय, समुद्रात मच्छीमारी व्यवसायासाठी खलाशी म्हणून हजारोंच्या संख्येने येत आहेत. या कामगारांची नोंद होताना दिसत नाही. भविष्यात या परप्रांतियांकडून दरोडे, घरफोडय़ा, बलात्कार, जीवघेणे हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करत प्रत्येक पोलीस ठाण्यात फोटो ओळखपत्रासह नोंद आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस अधीक्षकांनी जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्यांना परप्रांतीय कामगारांची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.