जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचा आदेश : नियमांचे पालन करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी या संबंधी आदेश बजावला असून कोविड नियमांचे पालन करुन यापुढे देवदर्शन घेता येणार आहे. 9 प्रमुख मंदिरे सोमवारपासून खुली करण्याचा आदेश दिला आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे देवदर्शन बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. खास करुन महाराष्ट्रातील भक्तांची ज्या प्रमुख मंदिरांत गर्दी असते ती मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला होता. सरकारच्या सुचनेनुसार सोमवारी ही बंदी उठविण्यात आली आहे.
सौंदत्ती येथील श्री रेणुका-यल्लम्मा मंदिर, जोगुळभांवी सत्यम्मा मंदिर, गोडची (ता. रामदुर्ग) येथील श्री वीरभदेश्वर मंदिर, चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवी मंदिर, पंतबाळेकुंद्री (ता. बेळगाव) येथील दत्त देवस्थान, बडकुंद्री (ता. हुक्केरी) येथील होळेम्मा देवी देवस्थान, मंगसुळी (ता. कागवाड) येथील खंडोबा (मल्लय्या) मंदिर, खिळेगांव (ता. अथणी) येथील बसवेश्वर देवस्थान, कोकटनूर (ता. अथणी) येथील श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान आता भाविकांसाठी खुले होणार आहे.
केवळ बेळगावच नव्हे तर राज्यातील प्रमुख मंदिरे दर्शनासाठी बंद होती. आता जिल्हाधिकाऱयांनी ही बंदी उठविली असली तरी विशेष उत्सव, जत्रा, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
एकावेळी पूर्णप्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या 50 पेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, अशी अट या आदेशात घालण्यात आली आहे.
भाविकांकरिता नियमावली…
देवदर्शनासाठी येणाऱया भाविकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. मंदिरांत प्रवेश करण्यापूर्वी भाविकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे, अनावश्यक गर्दी करु नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. मंदिरे उघडल्यानंतर मार्गसूचींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास पुन्हा बंदी घालण्यात येईल, असा इशारा देतानाच परिस्थितीनुसार आणखी नियम व अटी जारी करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱयांनी आदेशात स्पष्ट केले आहे.