अवघ्या महिन्याभरात दीड लाख मास्कची निर्मिती : साडेतेरा लाखाचे मिळविले उत्पन्न : 71 बचतगटांचा सहभाग
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाच्या लढाईत मास्क तयार करून विकण्यात जिल्हय़ातील बचतगट ‘मास लीडर’ ठरले आहेत. जिल्हय़ातील 71 बचतगटांनी 1 लाख 10 हजार 160 मास्क ची विक्री केली असून त्यातून त्यांनी 13 लाख 39 हजार 280 रूपये उत्पन्न मिळविले आहे.
कोरोनावरील उपाययोजनेचा एक भाग म्हणून सोशल डिस्टन्सिंग बरोबरच मास्क वापरही अत्यावश्यक बाब ठरली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत जिल्हय़ातील महिला बचतगटांना मास्क बनविण्यात पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. 22 मार्चनंतर आतापर्यंत तब्बल 71 बचतगटांनी यात सहभाग नोंदविला.
केवळ एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी 1 लाख 22 हजार 160 मास्कची निर्मिती केली. यापैकी 1 लाख 10 हजार 160 मास्क विकण्यात हे बचतगट यशस्वी झाले. जिल्हा आरोग्य विभागाला 25 हजार तर, ग्रामपंचायती, नगरपालिका यांनाही उर्वरित मास्कचा पुरवठा करण्यात आला. जागतिक आपत्ती काळात दळण-वळण थांबल्याने सुरूवातीला मास्कचा तुटवडा जाणवत होता. मात्र, बचतगटांनी योगदान देत यावर मात करण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांनी दिले.
तालुका बचतगट संख्या तयार केलेले मास्क विकलेले मास्क आर्थिक उत्पन्न
देवगड 10 49500 37500 450000
कुडाळ 17 23700 23700 284400
वैभववाडी 11 18900 18900 226800
दोडामार्ग 3 4380 4380 52560
सावंतवाडी 5 7000 7000 84000
वेंगुर्ला 16 12610 12610 151320
मालवण 4 3900 3900 46800
कणकवली 5 2170 2170 43400
एकूण 71 1,22,160 1,10,160 13,39,280