अकुशल कामगारांचा विचार करून घेतला निर्णय – जि. प. अध्यक्षा संजना सावंत : आवश्यक अर्ज ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करणार – संजना सावंत, अध्यक्ष, जिल्हा परिषद
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जलशक्ती अभियानामध्ये अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी जिल्हय़ात घरोघरी शोषखड्डा अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली.
कोरोना निर्बंधामुळे सद्यस्थितीत दळणवळण तसेच इतर बाबी बंद झाल्या आहेत. कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबना होण्याची शक्यता गृहित धरून केंद्राने यावर विशेष लक्ष दिले आहे. मनरेगा अंतर्गत अकुशल मजुरांना काम देण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यासाठी जलशक्ती अभियानामध्ये मान्सूनपूर्वी घरोघरी शोषखड्डे तसेच जलस्त्राsतांतील गाळ काढणे तसेच पाणी पुनर्भरणाची कामे करणे अपेक्षित असून यासाठी जिल्हा परिषदने पुढाकार घेतला आहे. ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करायची आहेत.
शेतकरी, मजुरांच्या हाताला त्वरित काम देण्यासाठी घरोघरी शोषखड्डा ही योजना उपयुक्त असून यामध्ये प्रती शोषखड्डा (1.20 बाय 1.20 बाय 1 मीटर) लाभार्थीला 2566 रुपये अनुदान मिळेल. काम पूर्णत: अकुशल स्वरुपाचे असून लवकर पूर्ण होणार असल्यानेही रक्कम लाभार्थीला त्वरित मिळू शकेल. ज्यामधून तो आपले खरीप बियाणे तसेच इतर अनुषंगिक खरेदी पूर्ण करू शकेल. या शोषखडय़ांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाचे काम होणार असून सांडपाणी व्यवस्थापन देखील होईल, असा दावा करण्यात आला.
दरम्यान, तालुकास्तरावर अंदाजपत्रके, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता पूर्ण करून तयार ठेवणे. अभियान प्रारंभदिनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत कामाचा प्ररंभ करावा. या कामाचे सनियंत्रण गटस्तरावर क्षेत्रीय अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱयांनी करायचे आहे. कामाच्या प्रगतीचा दैनंदिन अहवाल आवश्यक प्रपत्रामध्ये वेळीच वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतींना सूचना
15 ते 31 मे या पंधरवडय़ामध्ये सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शोषखडय़ांची 100 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी अभियान सुरू करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कार्यवाहीसाठी ग्रामपंचायतीने त्वरित शोषखड्डे घेण्यासाठी पात्र लाभार्थींची यादी निश्चित करून त्याला ग्रामसभा किंवा मासिक सभेची मान्यता घ्यावी. लाभार्थींचे प्रस्ताव तयार करून तालुकास्तरावर सादर करावेत, असे सांगण्यात आले.
तालुकानिहाय अधिकारी : कणकवली – जि. प. अध्यक्ष, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी. दोडामार्ग : जि. प. उपाध्यक्ष, गटविकास अधिकारी नरेगा. सावंतवाडी : महिला बालविकास सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालविकास. वेंगुर्ले : शिक्षण व आरोग्य सभापती, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी. मालवण : वित्त व बांधकाम सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन. कुडाळ : समाजकल्याण सभापती, समाज कल्याण अधिकारी. देवगड : मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता. वैभववाडी : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘बांधकाम’चे कार्यकारी अभियंता.