सक्रिय रुग्णांची संख्या 394
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात बुधवारी कोरोनाचे 31 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा सर्वेक्षण विभागाने बुधवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 25 हजार 315 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 34 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे 340 जण दगावले आहेत. 24 हजार 581 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आणखी 1885 जणांचे अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ात केवळ 394 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 27 हजार 561 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
दसरा, दिवाळी संपली. दिवाळीत तर शहर असो किंवा ग्रामीण भाग अनेक ठिकाणी नियमांचे पालन झाले नाही, असे चित्र पाहायला मिळाले. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती. यापैकी बहुतेक जणांनी मास्क परिधान करणेही टाळले होते. आता आणखी 8 ते 15 दिवसांत स्पष्ट चित्र पाहायला मिळणार आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 14 व ग्रामीण भागातील 1 अशा तालुक्मयातील 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बॉक्साईट रोड, भडकल गल्ली, अनगोळ, गुरुप्रसाद कॉलनी, मारुती गल्ली, शाहूनगर, गणेशपूर, शिवबसवनगर, विनायकनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.