आज अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीची तारीख 12 डिसेंबर ही निश्चित झाली आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्य निवडणूक आयोग आज जाहीर करील, असा अंदाज आहे.
भाजपच्या सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो वगळता सर्व आमदार उपस्थित होते. ही बैठक राज्यातील विकासकामासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली होती. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच पक्षाचे महामंत्री सतीश धोंड हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जि. पं. निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
आपापल्या मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सर्व आमदारांना केले. या बैठकीत अन्य विविध विषयांवरही चर्चा झाली.
मायकल लोबो नसल्याने संघर्ष टळला
या बैठकीत कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो हे उपस्थित नव्हते. यामुळे त्यांची सुटका झाली. मायकल लोबो यांनी दोन दिवसांपूर्वी एक निवेदन करून राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होणार अशी माहिती पत्रकारांना दिली होती. मायकल लोबो यांना अशी घोषणा करण्याचे अधिकार कोणी दिले, अशी पृच्छा मंत्री फिलीफ रॉड्रीगीज तसेच आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केली. त्यावर जोरदार चर्चा सुरू होती. मात्र मायकल लोबो उपस्थित नसल्याने याविषयावर कोणी बोलू नका अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.