उत्कर्षा मासिक पाळी व्यवस्थापन : ‘उत्कर्षा प्लस’ चळवळीचे यश
प्रतिनिधी /ओरोस :
जिल्हय़ाने एक नवा इतिहास रचला असून जि. प. च्या पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत राबविलेल्या उत्कर्षा मासिक पाळी व्यवस्थापन या कार्यक्रमाची ‘लिमका बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
30 जानेवारी 2020 रोजी लिमका बूकमध्ये नेंद झाल्याची माहिती मेलद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. या ऐतिहासिक घटनेची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी जिल्हाधिकारी दालनातील संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
जि. प. चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी उत्कर्षा हा मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम जिल्हय़ात सुरू केला होता. मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता, त्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापराचे महत्व याबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी पदावर आलेल्या के. मंजुलक्ष्मी यांनी या उपक्रमात गांभीर्याने लक्ष घालत ‘उत्कर्षा प्लस’ या नावाने ही चळवळ उभी केली होती.
हळदीकुंकू कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीनचे वाण म्हणून वाटप करण्याचा निर्णय घेऊन तो के. मंजुलक्ष्मी यांनी अंमलात आणला होता. 24 जानेवारी 2019 रोजी जिल्हा परिषदेसह आठ पंचायत समित्या आणि जिल्हय़ातील सर्व 431 ग्रामपंचायतींमधून 3 ते 6 या वेळेत हळदीकुंकू हा कार्यक्रम एकाच वेळी घेण्यात आला होता. जिल्हय़ातून याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. 66707 महिलांना 4 लाख 242 नॅपकिन वाण म्हणून देण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमाची माहिती 4 एप्रिल 2019 रोजी जिल्हाधिकारी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त सहीने लिमका बूक ऑफ रेकॉर्ड यांना लेखी स्वरुपात कळविण्यात आली होती. दरम्यान या अनोख्या उपक्रमाची दखल लिमका बूकने घेतल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. 22 एप्रिल रोजी ‘लिमका बूक ऑफ रेकॉर्ड’ मधून ती प्रकाशित होणार असल्याचे कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आणि जि. प. अध्यक्षांनी स्पष्ट केले.