प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यासह जिल्हा परिषदेत भाजप आघाडीच्या सत्ता कालावधीत केवळ निधीची घोषणा झाली; पण प्रत्यक्ष निधीचे वितरण झाले नाही. मात्र आगामी काळात तसे होणार नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार जिल्हा परिषदांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेच्या लढाईत अनेक घटक पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे आता आघाडीच्या सर्व सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रूपये दिले जातील. त्यांनी प्राधान्याने कामे सुरू करावीत, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हा परिषदेत आयोजीत केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जि.प.चे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सतीश पाटील यांच्या दालनाला भेट दिली. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण व अर्थ सभापती प्रविण यादव, विजय बोरगे, राजेश पाटील आदी सदस्यांनी मंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये विरोधात असताना आपल्या जि.प. सदस्यांना खूप त्रास झाला आहे. एक कोटीचा निधी सत्ताधाऱयानां तर विरोधी सदस्याची पाच लाखावर बोळवण केल्याचे मला समजले आहे. त्यामुळे हा बॅकलॉग भरून काढून महाविकास आघाडीच्या सदस्यांना न्याय दिला जाईल.महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्राधान्याने विचारात घेऊन कामे सुचवावीत. त्याची पूर्तता केली जाईल. लोकांना ही आपली सत्ता आहे असे वाटले पाहीजे, असे काम करा. तरच लोक पुन्हा तुमचा विचार करतील अन्यथा तुम्हालाही बसपाळी करावी लागेल. त्यामुळे वेळ जाण्यापूर्वी सावधपणे काम करा, असाही सल्लाही त्यांनी दिला.
विरोधी सदस्यांनाही योग्य निधी दिला जाईल
भाजप आघाडीच्या सत्ता कालावधीत निधी वाटपात विरोधी पक्षाच्या सदस्यांवर अन्याय झाला, त्याप्रमाणे यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही. विरोधी सदस्यांनाही योग्य प्रमाणात निधी दिला जाईल. प्रत्येकाला विकासकामे करण्याची संधी दिली जाईल, असेही मुश्रीफांनी यावेळी स्पष्ट केले.