प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजमधे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पदव्युत्तर भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गुलबर्गा विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु डॉ. बी. जी. मुलीमुनी तसेच एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर व कॉलेज मॅनेजमेंट कमिटीच्या व्हा. चेअरपर्सन माधुरी शानभाग उपस्थित होत्या.
व्यासपीठावर प्राचार्य बी. एल. मजकुर, प्रा. तोपिनकट्टी, प्रमुख पाहुणे डॉ. मुलीमुनी, प्रा. सुचेता कुलकर्णी तसेच सायन्स असोसिएशनचे चेअरमन डॉ. संदीप देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी ऐश्वर्या हिच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य मजुकरांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. संदीप देशपांडे यांनी परिचय करून दिला. डॉ. बी. जी. मुलीमुनी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करून नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांच्या कार्याचा आढावा घेतला. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत, कल्पकता, सचोटी व माणुसकी हे गुण अंगीकारणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. आपले रोजचे जीवन म्हणजे विज्ञानाचाच आविष्कार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी विज्ञानाचे स्मरण व महती लक्षात घेणे आवश्यक आहे. राजकारण, समाजकारण, धर्म या सर्वांपेक्षा विज्ञान श्रे÷ आहे.
फिजिक्स लॅबला अडीच लाखाची देणगी
माधुरी शानभाग यांनी विज्ञानामधील भौतिकशास्त्राचे स्थान व महत्त्व याबद्दल माहिती दिली. आपले पती व एसकेई सोसायटीच्या कॉलेज मॅनेजमेंटचे माजी चेअरमन स्व. डॉ. मोहन शानभाग यांच्या स्मरणार्थ त्यांनी भौतिकशास्त्राच्या एमएससी फिजिक्स लॅबला अडीच लाखाची देणगी जाहीर केली.
किरण ठाकुर यांनी अध्यक्षीय समारोप करताना जीवनातले विज्ञान व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आपले परदेशातील अनुभव कथन केले. प्रा. तोपिनकट्टी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. लता लक्ष्मेश्वर यांनी केले. डॉ. स्मिता काळगी यांनी मान्यवरांना व पालकांना फिजिक्स विभागाच्या विविध उपक्रम, प्रयोगशाळांची तसेच संशोधनाबद्दलची माहिती करून दिली. प्रा. पी. एस. पाटील यांनी आभार मानले.