1 लाख 2 हजार 709 कोटी रुपये जमा – आठ महिन्यातील निचांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ची स्थिती असल्याचा फटका जीएसटी संकलनाला बसला आहे. मे महिन्यातील जीएसटी संकलन घटले असून 1 लाख 2 हजार 709 कोटी रुपये इतकी वसुली झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात निचांकी संकलन असले तरी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिल्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात 1 लाख 41 हजार कोटी रुपये इतका विक्रमी जीएसटी जमा झाला होता.
अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एकूण जीएसटी महसूल संकलन 1,02,709 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा म्हणजे सीजीएसटी 17 हजार 592 कोटी रुपये, तर राज्यांचा हिस्सा म्हणजे एसजीएसटी 22 हजार 653 कोटी रुपये राहिला आहे. तर, आयजीएसटी 53 हजार 199 कोटी रुपये आहे. तसेच सेसच्या रूपात 9 हजार 265 कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये 868 कोटी रुपये आयातीतून मिळाले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक राज्यांनी व्यापक निर्बंध जारी केल्याने त्याचा अर्थकारणावर विपरित परिणाम झाल्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. त्याचा परिणाम जीएसटी कलेक्शनवर झाला आहे. तथापि आता अनेक राज्यांमध्ये अनलॉकिंग प्रक्रिया सुरू होत असल्याने अर्थकारणाला पुन्हा गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मे महिन्यात सरकारला 1.02 लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे.