नवी दिल्ली
आर्थिक मंदी असताना नवीन वर्ष 2020 च्या पहिल्याच दिवशी वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) आघाडीने अर्थव्यवस्थेला आनंदाची बातमी दिली आहे. डिसेंबरमध्ये जीएसटीचे संकलन सलग दुसऱया महिन्यात 1 लाख कोटींवर गेले आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 2019 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,03,184 कोटी रुपये झाले आहे. नोव्हेंबरमध्येही जीएसटी संकलन 1.03 लाख कोटी रुपये होते, तर ऑक्टोबर महिन्यात हा आकडा 95,380 कोटी रुपये होता. एकूण जीएसटीमध्ये केंद्राकडे 19,962 कोटी रुपये जमा झाले आहेत. तर राज्यांकडे 26,792 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
जीएसटी संकलन वाढवण्यासाठी सरकारने अधिक वेगवान प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन कल्पनांसह जीएसटी प्रणालीला अधिक मजबूत करण्यासाठी एक समिती बनविण्यात आली आहे. या समितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱयांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सरकार करचोरीच्या विरोधात धडक मोहीम राबवत आहे. जे लोक बनावट बिलाद्वारे टॅक्स क्रेडिटचा फायदा उठवत आहेत, त्यांच्या विरोधात तपास गतिमान केला जात आहे.