रोपे अन् फुले घेऊ शकतात जीव
जगात अनेक विचित्र जागा आहेत, ज्या माणसासाठी अत्यंत धोकादायक आहेत. असेच एक ठिकाण आहे इंग्लंडयच नॉर्थम्बरलँड शहरातील अल्नविक गार्डन. या गार्डनमध्ये फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अत्यंत सतर्कता बाळगावी लागणार आहे. येथे किचिंत चूकही जीवघेणी ठरू शकते. याचमुळे या गार्डनमध्ये मजबूत लोखंडी प्रवेशद्वार असून 24 तास सुरक्षारक्षक येथे पहारा देत असतो. या गार्डनमध्ये सुरक्षारक्षकाशिवाय प्रवेश करण्याची अनुमती देखील नाही.
नॉर्थम्बलँड शहरातील अल्नविक गार्डन अत्यंत सुंदर आहे, येथील नैसर्गिक सौंदर्य कुणालाही भुरळ पडावी असेच आहे. पण येथील सुंदर रोपं एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकतात. या विषारी उद्यानातील काही रोपे अत्यंत सुंदर असण्यासह घातक देखील आहेत.
ही रोपं अत्यंत आकर्षक असल्याने ती घातक असण्याची कल्पना करणे देखील अवघड आहे. अनेक रोपांच्या विषारी गुणधर्म आणि उपयुक्ततेविषयी येथे माहिती देण्यात आली आहे. या गार्डनमध्ये जीवघेण्या विषारी रोपांचीच लागवड करण्यात आली आहे. यासंबंधीचा इशारा प्रवेशद्वारावरील फलकाद्वारेच देण्यात आला आहे.
या झाडांना हात न लावण्याचा आणि गंध न घेण्याची ताकीद देखील देण्यात आली आहे. या गार्डनमध्ये काही अशा वनस्पती आहेत, ज्यांना केवळ स्पर्श केल्याने देखील ताप येऊ शकतो किंवा मृत्यू ओढवू शकतो.
याचमुळे उद्यानाचे प्रवेशद्वार संध्याकाळी बंद केले जाते आणि याची 24 तास सुरक्षा रक्षकांकडून देखरेख ठेवण्यात येते. या गार्डनमध्ये सुमारे 100 विषारी, मादक आणि गुंगी आणणारी रोपे आहेत. यात सुंदर निळे फुल सामील असून ते अत्यंत घातक आहे.
अनेक रोपांकडून लॉरेल, साइनाइडचे उत्पादन केले जाते, तर विशाल हॉगवीड फोटोटॉक्सिक आहे. याचा अर्थ हे त्वचेला भाजणारे आहे. या उद्यानात काम करणाऱया कर्मचाऱयांना अत्यंत धोकादायक रोपाची देखभाल करण्यासाठी विशेष सूट घालावा लागतो.
येथे अत्यंत साधारण रोपे आहेत, प्रत्यक्षात यातील अनेक रोपे कित्येकांच्या बगीच्यात लावलेली असतात, पण लोकांना ती किती हानिकारक असते याची जाणीव नसते असे उद्गार गार्डनचे प्रमुख कर्मचारी ट्रेवर जोन्स यांनी काढले आहेत.