प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारचा आठवडी बाजार कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या धास्तीत अडकला आहे. एरव्ही रविवारच्या लॉकडाऊनपूर्वी आठवडी बाजारात असणारी गर्दी ओसरल्याचे आणि कोरोनाच्या भीतीत विरून गेल्याचे दिसून आले. आठवडी बाजारात प्रामुख्याने उपनगरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी असते. मात्र, कोरोनाच्या धास्तीत नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याने आठवडी बाजार बहरला असला तरी म्हणावा तितका उठाव नसल्याचे दिसून आले. मात्र भाजीबाजार, किराणा माल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकडे जनतेचा कल असल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनच्या अफवेमुळे मागील आठवडय़ाच्या शनिवारी तसेच सोमवारी बाजारात तुफान गर्दी झाली होती. त्या तुलनेत या आठवडी बाजारात व्यापार नसल्याचे दिसून आले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा विचार करत अनेकांनी बाजारात येणे टाळले असले तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीला मात्र जोर असल्याचे दिसून आले. विवाह समारंभाच्या निमित्ताने मागील महिन्यात खरेदीला जोर होता. मात्र ही गर्दी ओसरली असून इतर दालने ग्राहकांविना रिकामीच आहेत. नागरिकांनी इतर साहित्य खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
भाजीपाल्याची आवक मंदावली, दर स्थिर
शनिवारच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावल्याचे दिसून आले. रविवारी लॉकडाऊन असल्याने आवक कमी झाली आहे. मात्र, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर स्थिर असून टोमॅटोचा दर मात्र प्रति किलो 45 ते 50 रु. आहे. होलसेल बाजारात प्रति दहा किलोप्रमाणे दोडकी 220 ते 250 रु., ढबू मिरची 400 ते 500 रु., गवार 220 ते 250 रु., वाटाणा 450 ते 500 रु., बिन्स 250 ते 280 रु., भेंडी 120 ते 130 रु., मिरची 150 ते 180 रु., कारली 220 ते 250 रु., वांगी 120 रु., बीट 150 ते 180 रु., कोबी 50 ते 60 रु. प्रमाणे होती.
पालेभाज्यांची आवक मागील आठवडय़ाच्या तुलनेत कमी झाली आहे. पालेभाज्या शेकडाप्रमाणे मेथी 600 ते 800 रु., पालक 400 ते 500 रु., लाल भाजी 400 ते 500 रु., शेपू 300 ते 400 रु., कोंथिबीर 500 ते 600 रु. याप्रमाणे दर आहेत. एपीएमसीमधील शनिवारच्या बाजारात कांदा-बटाटय़ाचे दर प्रति क्विंटलनुसार स्थिर असल्याचे दिसून आले. लाल कांदा 500 ते 1200 रु., सफेद कांदा 1000 ते 1600 रु., आग्रा बटाटा 2300 ते 2500 रु., इंदूर बटाटा 2400 ते 2600 रु., गुजरात बटाटा 2100 ते 2200 रु. प्रमाणे दर ठरविण्यात आले. किराणा मालाचे दर मागील आठवडय़ाप्रमाणेच स्थिर आहेत.